तारा भवाळकर यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

सांगली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे येथील नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्यावतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने सांगली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना भवाळकर म्हणाल्या की, ”नारायण सुर्वे यांनी साध्या भाषेत सामान्यांच्या दुःखाची कविता लिहिली. त्यांनी फक्त कष्टकऱ्यांवर कविताच लिहिली नाही तर कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष काम केले.”
अकादमीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, ”यंदाचे वर्ष हे नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्ताने अकादमीच्या वतीने राज्यभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.” याप्रसंगी कवी राजेंद्र वाघ, गदिमा महोत्सवाचे संचालक अरुण गराडे, प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, शब्दसाहित्य विचारमंचचे अध्यक्ष सचिन पाटील, प्रसिद्ध कवी अभिजीत पाटील, कवयित्री लता ऐवळे, कथाकार सुधीर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.













