राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळेगाव दाभाडे शहराध्यक्षपदी सुरेश धोत्रे यांची निवड

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांची एकमताने निवड करण्यात आली. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते धोत्रे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पदनियुक्ती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, सुरेशभाऊ चौधरी, माजी नगरसेवक दर्शन खांडगे, दिलीप खळदे, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश धोत्रे १९८५ पासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सलग सक्रिय असून, त्यांनी १९९७ आणि २०११ अशा कार्यकाळात नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात तळेगाव दाभाडेमध्ये अनेक विकासकामे झाली. यावर्षी धोत्रे यांची महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागातर्फे ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांच्या मानधनासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे जिल्हा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटना मुंबईच्या नियामक मंडळाचे ते सदस्य आहेत. तसेच नाट्य परिषद मावळ शाखेचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालय संस्थेचे ते अध्यक्ष असून, ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेचे ते प्रांतिक कार्याध्यक्ष आहेत.
दरम्यान, शहरातील नागरी सुविधा आणि सांस्कृतिक विकासाला प्राधान्य देणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.













