पक्षाची भूमिका स्पष्ट करून ‘डीपी’बाबत नागरिकांचा संभ्रम दूर करा – सुलभा उबाळे
उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन - प्रत्यक्ष संवाद साधण्याची केली मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांचा रोष दिसून येत आहे. टाकण्यात आलेली आरक्षणे, रेडझोन हद्द यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला असून याबाबत पक्षाची आणि उद्योग मंत्री म्हणून आपली स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी नागरिकांशी संवाद साधावा अशी मागणी उद्योग मंत्री तथा शिवसेना पुणे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये आपण याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे मात्र तरीही पिंपरी चिंचवड शहरात प्रत्यक्ष संवाद साधून नागरिकांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उद्योग मंत्री तथा शिवसेना पुणे जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांना शिवसेना उपनेत्या सुलभाउबाळे यांनी निवेदन दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे.पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी प्रशासनाने नव्याने प्रारूप विकास आराखडा सादर केला.या आराखड्याबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या . प्रारूप विकास आराखडा संदर्भात तब्बल 50 हजार नागरिकांनी आपल्या हरकती नोंदविल्या आहे. महापालिकेने टाकलेली विविध आरक्षणे, शेतकऱ्यांच्या जमिनीवर एकाच ठिकाणी बहु आरक्षणे, रेडझोनची हद्द अशा विविध गोष्टींमुळे प्रारूप आराखडा संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे. पिंपरी चिंचवड विकास आराखड्यामध्ये ( डीपी प्लॅन ) शहरातील अनेक नागरिकांचे राहते घर, शेतकऱ्यांच्या जागा बाधित होत असून ह्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनीवरती शेजारी शेजारी विविध आरक्षणे पडले असून, त्यामुळे तो शेतकरी भूमिहीन होणार आहे , ह्याबाबत नागरिकांची तीव्र नाराजी आहे .
उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की प्रारूप विकास आराखड्यामध्ये संपूर्णतः बिल्डर लॉबीचा फायदा बघण्यात आलेला आहे. हा आराखडा बिल्डर धार्जीना असून, बिल्डर लॉबीला डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला असल्याचे दिसून येत आहे. ह्या आराखड्याबाबत आतापर्यंत हरकतींचे अर्धशतक नोंदवले गेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती पिंपरी चिंचवड मनपाच्या इतिहासामध्ये प्रथमतः च प्राप्त झाल्या आहेत . तसेच काही ठिकाणी रेडझोनची लाल रेषा दाखवण्यात आलेली असून त्याबाबत देखील संभ्रम निर्माण झालेला आहे.
पक्षाची भूमिका स्पष्ट करा – सुलभा उबाळे
विधानभवनामध्ये स्थानिक आमदारांनी विकास आराखड्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्याबद्दल आपण सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका आपण विधानभवनामध्ये मांडली..मात्र विकास आराखड्याबाबत लवकरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी व सामान्य गोरगरीब नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील उबाळे यांनी केली आहे.













