ताज्या घडामोडीपिंपरी

नक्षत्र राज ज्योतिष रत्न पुरस्काराने वास्तुशास्त्र सल्लागार सुभाष चव्हाण सन्मानित

26 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफल व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या भव्य राज्यस्तरीय सोहळयाचे आयोजन सायन्स पार्क नाट्यगृह, चिंचवड,  येथे आयोजन करण्यात आले होते. वृक्ष पूजन करून, झाडाला पाणी घालून,पर्यावरण संदेश देत. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक नितीनशेठ लोणारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी,लेखक, समाजसेवक रामचंद्र पंडित, (सातारा )कार्यक्रमाचे उद्घाटक नितीनशेठ लोणारी, नक्षत्राचं देणं
काव्यमंच चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, श्रीकांत चौगुले, डॉ.अलका नाईक, सुलभा चव्हाण, अंजू सोनवणे,योगेश बाहेती आदी  उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी,साहित्यिक, समाजसेवक रामचंद्र पंडित आपल्या अध्यक्ष भाषणात म्हणाले की, ” नक्षत्राचं देणं काव्यमंचची यशस्वी वाटचाल कौतुकास पात्र आहे. अनेक कवींना व्यासपीठ उपलब्ध करून कवी घडवणारी क्रियाशील संस्था आहे. नाविन्यपूर्वक,सातत्यपूर्ण उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. माय मराठीच्या भाषेच्या अभिजात दर्जा उंचावण्याचे काम संस्था सतत करत आलेली आहे. कवींना स्वाभिमान शिकवणारी ही संस्था मनाला मोहित करते. इतिहासाच्या पानावर अक्षर वाड:मय चळवळ चालवणारी ही एक मोठी संस्था आहे. काव्यातून जीवन समृद्ध होते. आत्म्याचा आविष्कार म्हणजे कविता होय. भविष्यातील अनेकांच्या काव्य, साहित्य जीवनात प्रकाश दाखवणारी ही संस्था आहे. सुंदर श्रावण व निसर्ग कवितांची मैफल मनाला आनंद देऊन गेली. कवितेला प्राचीन परंपरा आहे. कवितेचे वैभव माणसांचे जीवन आनंदी करते. ”

यावेळी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी “कुसुमाग्रस स्मृती गौरव पुरस्कार “ज्येष्ठ साहित्यिक व कवी डॉ.राजेंद्र झुंजारराव,पुणे व सुप्रसिद्ध कवी उत्तम सदाकाळ,जुन्नर यांना स्मृतीचिन्ह, सन्मानचिन्ह,शाल, गुलापुष्प देऊन गौरवण्यात आले. समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार कवी सुनील बिराजदार सोलापूर, कवी नवनाथ पोकळे बीड, कवी बालाजी थोरात पिंपरी, कवी भाऊसाहेब आढाव चिंचवड यांना प्रदान करण्यात आला. तसेच नक्षत्र राज ज्योतिष रत्न पुरस्कार- सुभाष चव्हाण,थेरगाव तसेच नक्षत्र काव्य दौलत पुरस्कार -कवी मोहन काळे,मुंबई यांना प्रदान करण्यात आला.

समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना “समाजभूषण पुरस्कार” शिवप्रेमी विनायक खोत, जुन्नर, डॉ. हेमा चंद्रशेखर, भोसरी, निसर्गप्रेमी रमेश खरमाळे, जुन्नर, डॉक्टर मोहन गायकवाड, चिंचवड, डॉ.अलका नाईक,मुंबई यांना गौरवण्यात आले. तसेच उद्योजकांना देणारा, “उद्योजक गौरव स्मृती पुरस्कार” सचिन कुलकर्णी पुणे,नितीन सावंत,खेड राजेंद्र कोरे,निगडी, योगेश बाहेती,नाशिक यांना देण्यात आला.

यावेळी “19 वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा “मध्ये प्रथम क्रमांक- लोकमंगल मैत्र -सोलापूर, द्वितीय- क्रमांक कमांडर नवी मुंबई-अवतरण सकाळ मुंबई, तृतीय क्रमांक -कालनिर्णय , साप्ताहिक आघाडी, सिंधुदुर्ग यांना यश संपादन केल्याबद्दल गौरवण्यात आले.

नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या कट्टर,कवी नक्षत्र कार्यकर्त्यांना “नक्षत्र गौरव पुरस्कार” कवी अनिल केंगार सोलापूर, कवी अशोक उघडे साकोरी, कवियत्री डॉ. माधुरी बागुल नाशिक, कवयित्री सौ अलका खोशे मंगरूळ,कविवर्या प्रा. शितल कांडलकर नागपूर, कवी सुनील थोरात शिरूर, कवी अक्षय पवार अहिल्यानगर, कवी प्रा. शंकर घोरपडे पिंपळे गुरव, कवयित्री सौ वर्षा परांजपे सावंतवाडी, कवयित्री योगिता कोठेकर निगडी, कविवर्या निलावती कांबळे सोलापूर, कवी अशोक सोनवणे चिंचवड, कवी धनंजय माळी मंगळवेढा, कवी गौतमकुमार निकम चाळीसगाव, कवी जितेंद्र गवस सिंधुदुर्ग, कवी भरत वाजे फोफसंडी इ. सर्वांना मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव चिन्ह, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल, गुलापुष्प देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कवी वादळकार पुणे प्रा. राजेंद्र सोनवणे यांच्या “वादळाची अशांतता” चारोळी संग्रह, “आसक्या “ग्रामीण कथासंग्रह, “सुविचारसंग्रह 2025 “या पुस्तकांचे सुद्धा प्रकाशन करण्यात आले.

यावेळी नक्षत्राचं देणं काव्यमंच च्या “यूट्यूब चैनल “चे सुद्धा उद्घाटन करण्यात आले. तसेच “26 वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेत “प्रथम क्रमांक- कवयित्री दीप्ती कुलकर्णी हैदराबाद -(येता श्रावण), द्वितीय क्रमांक -कवयित्री सौ वैशाली शिरसागर कोल्हापूर- (श्रावण), तृतीय क्रमांक -कवी अजित राऊळ सिंधुदुर्ग- (निसर्ग) या कवितेला रोख रक्कम, स्मृतीचिन्ह,गौरव चिन्ह,सन्मानपत्र,शाल गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सौ रूपाली भालेराव यांनी बहारदारपणे केले. सलग सात तास चालणाऱ्या या भव्य सोहळ्याचे आभार प्रदर्शन कवी सुनील बिराजदार यांनी केले व समारोप विश्वगीत पसायदान आणि करण्यात आला.

कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये बबन चव्हाण, सौ प्रीती सोनवणे,विकास राऊत, ज्ञानेश्वर काजळे,जुई यादव, भाऊसाहेब आढाव प्रा. काशिनाथ भुतुगे, संजय पोटे, मुजफ्फर इनामदार, संतोष देशमुख,नवनाथ पोकळे,दिव्या भोसले, बालाजी थोरात, गणेश लखणे, प्रकाश दळवी आदीनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button