ताज्या घडामोडीपिंपरी

हेमंतकुमार यांच्या हिंदी –  मराठी गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध

Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत हेमंतकुमार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘द सोलफुल मेलोडिज ऑफ हेमंतकुमार’ या अवीट गोडीच्या हिंदी – मराठी गीतांच्या सुरेल नि:शुल्क सांगीतिक मैफलीत (बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर ) निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृहात श्रोते मंत्रमुग्ध झाले. राखी झोपे यांची संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या संयोजनातून साकार झालेल्या या सांगीतिक मैफलीत माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, उद्योजक शंकर गावडे आणि विनीत राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकुमार सुठंवाल, आशुतोष ठाकूर, मंगेश उमराणी, सुकेतू शाह, संजीव रानडे, सागर पाटील, दत्तात्रय कुंभार, उमेश घाणेकर, अनिल झोपे या गायकांसह स्वाती केसकर, नम्रता सारडा, नयना काळकर या गायिकांनी मैफलीत आपला सुरेल सहभाग नोंदवला. याशिवाय मीरा भावे आणि उल्हास भावे तसेच मंजुषा तातू आणि राजेश तातू हे दांपत्यही या सुरेलयात्रेत सहभागी झाले होते.
धीरगंभीर आवाजाचा गायक आणि श्रवणीय गीतांचा संगीतकार ही हेमंतदा यांची संगीत श्रेत्रातील सफल कारकीर्द सहभागी गायक कलाकारांनी वैविध्यपूर्ण गीतांच्या प्रभावी सादरीकरणातून साकार करीत श्रोत्यांकडून वन्स मोअरसह उत्स्फूर्त टाळ्यांची दाद मिळवली. या सांगीतिक मैफलीत ‘तुम पुकार लो…’ , ‘या दिलकी सुनो…’ , ‘ये रात ये चाँदनी…’ , ‘बेकरार करके…’ , ‘भँवरा बडा नादान…’ , ‘जाने वो कैसे लोग थे…’ , ‘तेरी दुनिया में…’ , ‘ना तुम हमे जानो…’ , ‘वो शाम कुछ…’ , ‘ना ये चाँद  होगा…’ , ‘जरा नजरोंसे कहे दो…’ , ‘पिया ऐसे जियाँ में…’ , ‘ये नयन डरे डरे…’ , ‘कही दीप जले कही दिल…’ , ‘कुछ दिलने कहाँ…’ या एकल आणि ‘तुम्हे याद होगा…’ , ‘आ नील गगनके तले…’ , ‘गोमू संगतीनं…’ , ‘गुमसुमसा ये जहाँ…’ , ‘छुपा लो यू दिलमें…’ , ‘नींद ना मुझको आये…’ , ‘इतना तो कहे दो…’ , ‘याद किया दिलने…’ , ‘एक बार फिर…’ , ‘तुम्ही मेरे मीत हो…’ या युगुल आणि द्वंद्व स्वरातील एकाहून एक सुंदर गीतांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
गीतांच्या ठेक्याला टाळ्यांची साथ देत अन् वन्स मोअरची मागणी करीत असलेल्या रसिक श्रोत्यांना ‘मी डोलकर…’ या सदाबहार गीतावर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप ‘प्रीतीच्या चांदराती… या भन्नाट मराठमोळ्या गीताने करण्यात आला. म्युझिक व्हिजनने ध्वनिसंयोजन केले. विक्रम क्रिएशन्सने तांत्रिक साहाय्य केले. संजय वाघचौरे यांनी छायाचित्रण केले. मनीष गोखले यांच्या खुमासदार आणि अभ्यासपूर्ण निवेदनामुळे मैफल अधिकच रंगतदार झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button