ताज्या घडामोडीपिंपरी
समर्पित सेवेला सन्मानाचा सलाम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोहम् सार्वजनिक ग्रंथालय आणि अभ्यासिकेच्या वतीने संत तुकारामनगर, पिंपरी येथे दीपावलीनिमित्त महानगरपालिका ह विभागातील स्वच्छतादूत कर्मचारीवर्गाच्या समर्पित सेवेला सन्मानाचा सलाम करण्यात आला.
महानगरपालिका माजी शिक्षण उपसभापती मायला खत्री, माजी नगरसेविका सुजाता पलांडे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, सामाजिक कार्यकर्ते किरण सुवर्णा, संत तुकारामनगर पोलीस स्थानकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल शेटे, अभिजित गोफण, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, संचालिका निर्मला नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छतादूत महिला कर्मचारीवर्गाला साड्या आणि पुरुष कर्मचारीवर्गाला पेहराव तसेच मिठाई आणि फळफळावळ यांचे वाटप करण्यात आले. जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविकातून, ‘सफाई कामगार हे खऱ्या अर्थाने समाजसेवक आणि आरोग्यरक्षक असून गेल्या पाच वर्षांपासून ग्रंथालयाच्या वतीने दीपावलीनिमित्त त्यांना सन्मानित करण्यात येते.’ अशी माहिती दिली.
सुजाता पलांडे यांनी, ‘सोहम् सार्वजनिक ग्रंथालय हे संस्कारक्षम अधिकारी घडविण्यासोबत सामाजिक जाणिवेतून सातत्याने विविध उपक्रम राबविते. ‘ असे गौरवोद्गार काढले. यावेळी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांची उपस्थितांना माहिती देण्यात आली. गौरव चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. नंदू कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास वाचक, स्पर्धा परीक्षक आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

















