‘रेड झोन’प्रमाणे सोसायटीधारकांनाही ५०% मालमत्ता कर सवलत द्या! – पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनची मागणी

– महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकताच रेड झोनमध्ये येणाऱ्या मिळकतधारकांना मालमत्ता करात ५०% सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहरातील हजारो प्रामाणिक कर भरणाऱ्या सोसायटीधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देत ठाम मागणी केली आहे की, “सवलत द्यायचीच असेल, तर शहरातील हजारो सोसायटीधारकांनाही ती दिली गेली पाहिजे. अन्यथा हे निर्णय प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करणारे ठरतील.”
फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, सोसायट्यांना आजही मूलभूत नागरी सुविधा मिळत नाहीत, नियमित पाणीपुरवठ्याऐवजी टँकरवर अवलंबून रहावे लागते. रस्त्यांची अवस्था दयनीय आहे; काही ठिकाणी रस्तेच नाहीत. कचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा, स्वच्छतेचा अभाव आहे वाहतूक नियोजनाचा पूर्णत: अभाव आहे. “आम्ही नियमित कर भरतो, तरीही आम्हाला मूलभूत सुविधा नाकारल्या जातात. त्याचवेळी काही ठिकाणी केवळ स्थानिक राजकीय दबावाखाली सवलती दिल्या जातात – हे अन्यायकारक आहे.”
सवलत हवीच, अन्यथा लोकशाही मार्गाने लढा…
फेडरेशनने इशारा दिला आहे की जर सोसायटीधारकांनाही ५०% सवलत त्वरित जाहीर केली नाही, तर शहरातील सर्व सोसायट्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील. “राजकीय फायद्यासाठी निवडक घटकांना सवलत देणं म्हणजे प्रामाणिक करदात्यांची थट्टा आहे. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही,” असा सजग इशारा फेडरेशनने दिला आहे.
“महापालिकेकडून आम्हा सोसायटीधारकांकडून नियमित कर घेतला जातो, पण त्याच्या बदल्यात पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. आणि अशा परिस्थितीत जर केवळ रेड झोनमध्ये येणाऱ्या मिळकतधारकांना ५०% कर सवलत दिली जात असेल, तर ती प्रामाणिक करदात्यांच्या विश्वासाला तडा देणारी गोष्ट आहे. हा अन्याय थांबवण्यासाठी सोसायटीधारकांनाही तत्काळ ५०% सवलत द्यावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत.
— संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.








