स्व. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्नेहसावली आश्रमाला समाजदूत पुरस्कार प्रदान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्व. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यावर्षी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश वैद्य यांच्या स्नेहसावली आश्रमाला समाजदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. आश्रमासाठी थोडे धान्य देखील देण्यात आले. हा पुरस्कार सुधा कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. वैद्य यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन विवेक दिगंबर कुलकर्णी यांनी केले होते. या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, पीसीएमसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, डॉ मनाली अविनाश वैद्य, मीनाक्षी कुलकर्णी उपस्थित होते. साधेपणाने झालेला हा घरगुती सोहळा सर्वांच्या मनाला भावणारा ठरला.
डॉ. अविनाश वैद्य हे अनेक वर्षांपासून स्नेहसावली वृद्धाश्रम चालवत असून समाजाने किंवा कुटुंबाने नाकारलेल्या वयोवृद्धांना आधार व मायेचा आश्रय देण्याचे कार्य ते निस्वार्थपणे करीत आहेत. “मूर्ती आमची, किंमत तुमची” हा त्यांचा अभिनव उपक्रम समाजात विशेष गाजला आहे.
“डॉ. वैद्य यांनी हा पुरस्कार स्वीकारल्याने प्रत्यक्षात सृजन प्रतिष्ठानच उपकृत झाले आहे,” असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. स्नेहसावली आश्रमाला शक्य ती मदत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.















