श्री साईनाथ तरुण मंडळाचा सुवर्ण महोत्सव समाजसेवेच्या उपक्रमांनी साजरा

काळेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडीतील श्री साईनाथ तरुण मंडळ यंदा आपला ५० वा वर्षपूर्ती सोहळा म्हणजेच सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात आणि समाजसेवेच्या विविध उपक्रमांनी साजरा करत आहे. या विशेष वर्षात मंडळाने सामाजिक जाणीवेचे दर्शन घडवत स्पंदन बालश्रमातील अनाथ मुलांच्या हस्ते श्रींची आरती करून एक आगळीवेगळी परंपरा प्रस्थापित केली.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पंदन बालश्रमच्या विद्यार्थ्यांना अन्नधान्य व शिधा साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचे प्रोप्रायटर श्री दिलीप सोनीगरा आणि श्री प्रीतम संघवी यांच्या हस्ते पार पडला. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.
कार्यक्रमावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश लंगोटे, स्पंदन बालश्रम संस्थेचे गणेश म्हसके, यशवंत नामदे, तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम पुढील काळातही राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.














