“शिवाजी येळवंडे यांची चेअरमनपदी एकमताने निवड; पिंपरी चिंचवड मनपा सेवकांची पतसंस्था नवे संचालक मंडळ स्थापन”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची पतसंस्था मर्यादित, सन २०२३–२०२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीनंतर दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये शिवाजी येळवंडे यांची चेअरमनपदी, ज्ञानेश्वर शिंदे यांची व्हा. चेअरमनपदी, विश्वनाथ लांडगे यांची सेक्रेटरीपदी व अभिषेक फुगे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राऊत (जिल्हा उपनिबंधक, पुणे शहर १) यांच्या अध्यक्षतेखाली व कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा कारभार पारदर्शक, विनम्र आणि तत्पर सेवेच्या धर्तीवर चालवण्याचा संकल्प केला आहे. सभासदांना बचतीसाठी प्रोत्साहित करताना ठेवींवर ९% पर्यंत व्याजदर, कन्यादान योजनेसाठी १०% ते १०.५% व्याज, तसेच कर्जासाठी केवळ १९% व्याजदर लागू करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे.
माजी अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी अधोरेखित केल्यानुसार, संस्थेची वार्षिक उलाढाल १६ वर्षांपूर्वी ₹१७ कोटी होती, जी आता वाढून ₹२०३ कोटीच्या वर गेली आहे. कर्ज मर्यादा ₹५०,००० वरून थेट ₹२० लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून, थकबाकी फक्त ०.५०% आहे. संस्थेला सतत ‘अ वर्ग’ दर्जा मिळत आहे.
संस्था स्थापनेपासून सलग ५० वर्षे नफ्यात असून, सभासदांना १४% पर्यंत लाभांश वाटप केला जातो. वैद्यकीय किट वाटप, मयत सभासदांचे कर्जमाफ करणे यासारख्या उपक्रमांमुळे संस्था राज्यात आदर्शवत ठरली आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळ व सल्लागारांनी संस्थेची आर्थिक प्रगती आणि सभासदांच्या हितासाठी अधिकाधिक काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कार्यक्रमास संस्थेचे विद्यमान संचालक, माजी पदाधिकारी, सल्लागार, महासंघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.








