“निळू फुले नाट्यगृह ऑनलाईन बुकिंग रद्द करा – भाजप शहराध्यक्षांची मागणी
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्तांना दिले निवेदन; स्थानिक कलाकारांना संधी न मिळाल्याची तक्रार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -भाजपा शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न बापु काटे यांनी पालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांना लेखी निवेदणाद्वारे निळू फुले नाट्यगृह संदर्भातील काही प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.
आपल्या निवेदनात शत्रुघ्न काटे यांनी लिहले आहे की,निळू फुले नाट्यगृह हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे एक प्रमुख नाट्यगृह असून हे शहरातील एक अत्यंत महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे,जेथे अनेक नाट्यप्रयोग,संगीत मैफिली, शालेय व महाविद्यालयीन कार्यक्रम सातत्याने पार पडत असतात.पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत पारदर्शकता,वेळेची बचत,गैरव्यवहार टाळणे आणि प्रक्रियेला डिजिटल स्वरूप देणे या उद्दिष्टांच्या अधीन राहून नाट्यगृहासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली असावी परंतु गेल्या काही काळात या नाट्यगृहासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनेक अडचणी व गैरसोयींचे कारण बनली आहे. अर्जदार नाट्यगृहाच्या वेबसाइटवर जाऊन कार्यक्रमासाठी तारीख,वेळ आणि इतर माहिती भरून नोंदणी करतो. या प्रक्रियेमुळे काही त्रुटि माझ्या निदर्शनास आले आहे,जसे की ………
१) तांत्रिक अडथळे:
संकेतस्थळ वारंवार बंद पडते किंवा माहिती अपूर्ण असते.अपलोड केलेली कागदपत्रे योग्य प्रकारे सादर होत नाहीत.
२) स्थानिक कलावंतांसाठी असुविधा:
अनेक कलाकार,संस्था अजूनही डिजिटल प्रणालीत पारंगत नाहीत.स्थानिक कार्यालयात प्रत्यक्ष भेटीने नोंदणी करणे त्यांना अधिक सोयीचे वाटते.
३) दुरुपयोगाच्या तक्रारी:
काही वेळा आरक्षणे ‘ब्लॉक’ ठेवली जातात आणि इतरांना उपलब्धता दाखवली जात नाही. ऑनलाईन नोंदणीमुळे एखादी संस्था वारंवार बुकिंग करून इतर संस्थांना संधी मिळू न देणे.
४)तक्रार केल्यावर प्रतिसाद मिळण्यासाठी खूप वेळ लागतो.आपत्कालीन कार्यक्रम(शोकसभा,सन्मान सोहळे) यासाठी लवकर तारीख न मिळणे.
अश्या अनेक प्रश्नांकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन दिले आहे आणि या निवेदांनाच्या माध्यमातून सद्य ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करावी,पारंपरिक (कार्यालयीन) नोंदणी पद्धती पुन्हा सुरू करावी, हायब्रिड (ऑनलाईन+ऑफलाईन) प्रणालीस मान्यता द्यावी,एका संस्थेला ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वेळा आरक्षण करण्यास बंदी घालावी इ.
ही मागणी फक्त तात्कालिक अडचणीसाठी नाही किंवा आमचा हेतू कोणत्याही संस्थेला डावलणे नाही,तर सर्वांना समान संधी देणे, पारदर्शक व्यवस्था निर्माण करणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक जीवनाला गतिमान ठेवणे तसेच भावी पिढ्यांसाठी सुसंगत व्यवस्था निर्माण करण्यासाठी आहे.













