स्व. गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण जीवन शेतकरी, गरिब आणि कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी समर्पित केले – शत्रुघ्न काटे
स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकनेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने पिंपरी येथील मोरवाडी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मुंडे साहेबांच्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची आठवण करून दिली. काटे म्हणाले, “गोपीनाथजी मुंडे हे फक्त एक नेते नव्हते, तर ते सामान्यांचे, वंचितांचे आणि महाराष्ट्राच्या मातीतील सर्वसामान्यांचे खरे आधारस्तंभ होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या आणि कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी समर्पित केले. त्यांचे विचार आणि त्यांची जनसेवेची तळमळ आजही सर्वांना प्रेरणा देत आहे.”
आमदार महेशदादा लांडगे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, स्व. गोपीनाथजी मुंडे यांनी ग्रामीण भागातून येऊन दिल्लीपर्यंत मजल मारत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपला अमीट ठसा उमटवला. “त्यांच्या कार्यामुळेच आज भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यांचे कार्य आणि विचार हे आपल्या पक्षासाठी एक अनमोल ठेवा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, माजी महापौर केशव घोळवे, सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, विजय फुगे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, बिभीषण चौधरी, नंदकुमार दाभाडे, खंडूदेव कठोरे, दत्तात्रय ढगे, सुनील लांडगे, नंदू कदम, रोहिणी रासकर, दत्ता यादव, संतोष टोंणगे, मधुकर बच्चे, दीपक नागरगोजे, समीर जावळकर, मंडल अध्यक्ष मंगेश धादगे, सतीश नागरगोजे, मनोज ब्राह्मणकर, प्रमोद ताम्हणकर, शशिकांत पाटील, सचिन राऊत, संजय परळीकर, नेताजी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना वंदन करत त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजात अधिक सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.













