“डावललेला नेता पुन्हा फोकसमध्ये; महापौरपदासाठी शत्रुघ्न काटेंचा दावा”
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीची राजकीय रणधुमाळी पुन्हा एकदा तापू लागली आहे. आरक्षण सोडतीत महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले होताच, आतापर्यंत संधीपासून दूर ठेवले गेलेले अनेक नगरसेवक सक्रिय झाले असून भाजपमधील अंतर्गत समीकरणांना नवी धार मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी महापौरपदासाठी थेट दावा ठोकत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. “मी महापौरपदासाठी इच्छुक आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी निर्णयाचा चेंडू थेट पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टाकला आहे.
भाजप संघटनेत दीर्घकाळ निष्ठेने काम केलेले शत्रुघ्न काटे हे पक्षातील अनुभवी आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. २०१२ आणि २०१७ मध्येही ते महापौरपदाच्या शर्यतीत होते. विशेषतः २०१७ मध्ये भाजप सत्तेवर येताना काटे यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर होते. मात्र, अंतर्गत राजकारण आणि राजकीय समीकरणांमुळे ऐनवेळी त्यांची संधी हुकली आणि नितीन काळजे यांना महापौरपदाचा मान मिळाला.
भाजपच्या ऐतिहासिक सत्तेचा पहिला महापौर होण्याची संधी हुकल्याने काटे यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपदापासून ते कोणत्याही महत्त्वाच्या पदापर्यंत त्यांना कायम दूरच ठेवण्यात आले.
चिंचवड मतदारसंघात जगताप कुटुंबाच्या उमेदवारीला उघड विरोध करूनही शत्रुघ्न काटे पक्षाशी ठाम राहिले. त्यानंतरच त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघटनात्मक बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि पक्षातील एकजूट यामध्ये काटे यांनी निर्णायक भूमिका बजावल्याचे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगितले जाते.
२०२६ च्या महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता टिकवून ठेवण्यात काटे यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा राहिला आहे. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या काळात जशी भाजपची घडी बसली होती, त्याच धर्तीवर काटे यांच्या काळातही सत्ता अबाधित राहिल्याचे चित्र आहे.
दरम्यान, महापौरपदासाठी भाजपमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून भोसरी विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे, माऊली जगताप, जालिंदर शिंदे, शीतल शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक इच्छुक असल्याची माहिती आहे.
या सत्तासंघर्षात शत्रुघ्न काटे यांची एन्ट्री भाजपमधील अंतर्गत राजकारण अधिकच तापवणारी ठरणार असून, ‘निष्ठेला संधी मिळणार की पुन्हा डावलले जाणार?’ हा प्रश्न आता शहराच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.




















