ताज्या घडामोडीपिंपरी

विधवा महिलांच्या हस्ते ध्वजारोहण; पिंपरीतील शरवरी विंडगेट्समध्ये प्रजासत्ताक दिनाला सामाजिक समतेचा संदेश

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी येथील शरवरी विंडगेट्स, पुनावळे येथे एक आगळा-वेगळा आणि समाजप्रबोधन करणारा उपक्रम राबविण्यात आला. सोसायटीच्या आवारात पार पडलेल्या ध्वजारोहण समारंभात विधवा महिलांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून सामाजिक समतेचा आणि सन्मानाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

या उपक्रमामागील मुख्य उद्देश समाजातील विधवा महिलांना समान आदर, संधी आणि सहभाग मिळावा हा होता. पारंपरिक रूढी-परंपरांपलीकडे जाऊन, विधवा महिलांच्या हातून राष्ट्रध्वज फडकवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांच्या अस्तित्वाची व योगदानाची दखल घेण्याचा हा संवेदनशील प्रयत्न ठरला.
सकाळी ८.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सोसायटीच्या सचिव सौ. प्रमोदिनी सुहास लांडगे, व्यवस्थापक तसेच मोठ्या संख्येने सोसायटी सदस्य उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायन करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत वातावरण देशप्रेमाने भारावून टाकले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रविण जाधव यांनी केले.
यावेळी बोलताना सोसायटीच्या सचिवांनी सांगितले,
“हा कार्यक्रम केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान देण्याचा आमचा संकल्प आहे. आज विधवा भगिनींच्या हस्ते तिरंगा फडकवून आम्ही समाजाला एक सकारात्मक संदेश देत आहोत की प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे.”

या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांसह सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, अशा सर्जनशील आणि संवेदनशील उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
यावेळी विनोद बिरादार, अश्विन गुजराथी, शिवाजी बांदल, चेतन ढेकणे, वंदना अन्नदाते, वैशाली पवार, भावना वाल्मिकी यांच्यासह इतर सर्व सोसायटी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button