“जागर कायद्याचा, सन्मान वारकऱ्यांचा” या सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोफत कायदेविषयक सेवा शिबिराचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२५ या पावन पार्श्वभूमीवर, “जागर कायद्याचा, सन्मान वारकऱ्यांचा” या सामाजिक उपक्रमाअंतर्गत एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) व एस.एन.बी.पी. माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत महाविद्यालय प्रांगणात मोफत कायदेविषयक सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात वयोवृद्ध वारकरी, महिला आणि गरजू नागरिकांना विविध कायदेविषयक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.त्यामध्ये महिलांचे कायदेहक्क व सक्षमीकरण,बालकांचे हक्क व संरक्षण कायदे,सायबर गुन्हे व उपाय,संपत्ती व जमिनीवरील हक्क व वाद,ऑनलाइन तक्रार निवारण प्रक्रिया
कार्यक्रमाची सुरुवात धाराशिव दिंडीतील ज्येष्ठ वारकऱ्याच्या सत्काराने झाली, तर एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “हुंडाबळी प्रतिबंध कायदा” या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून समाजप्रबोधन घडवले.
प्राचार्य डॉ. भारत डोंगरे, प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप, उपप्राचार्य श्री. कैलास पोळ यांनी विविध कायद्यांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.विशेषतः, “पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम, 2007” या अत्यंत महत्त्वाच्या कायद्याविषयी महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे सभासद अॅड. मंगेश खराबे यांनी दिलेली सखोल माहिती उपयुक्त ठरली.
या कायद्यानुसार, वृद्ध पालकांना मुलांकडून कायदेशीर पद्धतीने निर्वाहासाठी मदत मिळवण्याचा अधिकार प्राप्त होतो.उपस्थित मान्यवरांमध्ये:प्रा. स्वप्नील जाधव (विधी सेवा अधिकारी), प्रा. प्रिया तोटले, डॉ. सोनल देशमुख, डॉ. उज्ज्वला भारती, डॉ. सुनीता तपासे, प्रा. नंदा माळी, प्रा. सायली सातोनकर, प्रा. गजानन सर, प्रा. कुशाग्र विक्रम, प्रा. अभिराझी बहुलयान, प्रा. नितेश राठोड यांच्यासह पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे सचिव अॅड. उमेश खंदारे, माजी सचिव अॅड. धनंजय कोकणे, अॅड. राजेश राजपुरोहित, अॅड. संकेत सरोदे, अॅड. विकास शर्मा यांची उपस्थिती होती. ज्यांना पुढील कायदेशीर मदतीची गरज आहे, अशा नागरिकांची नावनोंदणी करून DLSA कडे माहिती सुपूर्त करण्यात येणार. त्यांना टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला.भर पावसातही प्रबोधनकार्य अविरत सुरू राहिलं.वारकऱ्यांकडून लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या उपक्रमाची परिणामकारकता अधोरेखित झाली. “वारीतील कायदेसेवा” ही सामाजिक न्यायासाठीची चालती फिरती पाठशाळा ठरली.
वारीतील पावलं होती देवासाठी, आणि आमची सेवा होती न्यायासाठी! पालखीतून न्यायाची पालखी चालली होती.जिथं वारकऱ्यांच्या पायांना कायद्याचं पाठबळ लाभल.












