घरकुल चिखली परिसरात १६ तास वीज गायब; नागरिक त्रस्त साठे प्रतिष्ठानचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखलीतील घरकुल परिसरात सलग १५ ते १६ तास वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे नागरिकांचे रोजचे जीवन विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात मारुती जाधव, अध्यक्ष – जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान घरकुल, यांनी आकुर्डी विभागाचे विद्युत अभियंता जाधव साहेब यांच्याकडे लेखी निवेदन देत तक्रार नोंदवली.
जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घरकुल चिखली परिसरातील वीजपुरवठा वारंवार आणि दीर्घकाळासाठी खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, महावितरण विभागाचे कर्मचारी याबाबत कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
घरकुल परिसरासह महात्मा फुले नगर, शरदनगर, पूर्णानगर, कृष्णानगर, अजंठा नगर, कोयनानगर, सुदर्शननगर या परिसरांमध्ये देखील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या निवेदनात चेतावणी देण्यात आली आहे की, जर महावितरण विभागाने त्वरित सुधारणा न केल्यास, आकुर्डी येथील थरमॅक्स चौकातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल. हे आंदोलन मारुती जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, तिव्र स्वरूपाचा निषेध नोंदवला जाईल.
महावितरण विभागाकडून याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.








