पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सादर केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शहरातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, वाघेरे पाटील यांचा लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेल्या राजीनाम्यात संजोग वाघेरे पाटील यांनी नमूद केले आहे की, “काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे सध्या मी माझ्यावर सोपवण्यात आलेली संपूर्ण जबाबदारी अपेक्षेप्रमाणे पार पाडू शकत नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेत शहराध्यक्ष तसेच पक्ष सदस्य या दोन्ही पदांचा राजीनामा देत आहे.” त्यांच्या या अधिकृत भूमिकेमुळे राजीनामा हा वैयक्तिक कारणांवर आधारित असल्याचे सांगण्यात येत असले तरी, त्यामागील राजकीय घडामोडींवर विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मतांची कामगिरी
संजोग वाघेरे पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत वाघेरे पाटील यांना तब्बल ५ लाख ९६ हजार मते मिळाली होती. जरी त्यांना विजय मिळवता आला नसला, तरीही मिळालेली मते ही त्यांची वैयक्तिक ताकद आणि मतदारांमधील पकड दर्शवणारी ठरली होती.
पक्षत्यागाच्या चर्चांना दुजोरा
गेल्या काही दिवसांपासून संजोग वाघेरे पाटील हे शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज त्यांच्या राजीनाम्याने या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही मोठी धक्कादायक घटना मानली जात आहे.
फडणवीस भेटीनंतर भाजप प्रवेश निश्चित?
दरम्यान, नुकतीच संजोग वाघेरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात त्यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात असून, येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकीकडे ठाकरे गटासाठी हा मोठा संघटनात्मक धक्का मानला जात असताना, दुसरीकडे वाघेरे पाटील यांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकद आणखी वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
