सांगवी–पिंपळे गुरवमध्ये मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा उपद्रव वाढला; नागरिक भयभीत, मानवी हक्क संघटनेचे मनपाला निवेदन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील उपनगरांमध्ये मोकाट कुत्रे आणि भटक्या जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गल्ली–बोळ, रस्ते, चौक आणि वसाहतींमध्ये ४ ते १० च्या टोळक्याने फिरणारे कुत्रे व जनावरे नागरिकांना धास्तवू लागले आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात भीतीचे सावट निर्माण झाले असून अनेक जण बाहेर पडण्यास घाबरत आहेत.
नागरिकांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला तरी ही मोकाट जनावरे अंगावर धावून येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी या गंभीर समस्येकडे मनपाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, “शहरातील परंपरागत गोठे, गाय-म्हशी-बैलांचा कोंढवाडा जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे. चिखली सर्वे नं. 1655 मधील प्रास्तावित पाच एकरांचा गुरांचा गोठा आजही कागदोपत्रीच अडकून पडला आहे. मनपा प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार आणि पशुवैद्यकीय विभागाचा ढिसाळ दृष्टिकोन यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.”
जोगदंड यांनी पुढे सांगितले की, नुकत्याच न्यायालयाने शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, उद्याने, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरातील मांजर–कुत्रे आणि भटकी जनावरे त्वरित निवारागृहात हलवण्याचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई दिसत नाही. फक्त टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असून नागरिकांची गैरसोय वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर जोगदंड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना भेटून मोकाट कुत्रे व जनावरांवर तातडीने नियंत्रण आणण्याचे निवेदन दिले. “लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या दहशतीतून मुक्त करावे,” अशी स्पष्ट मागणी करण्यात आली.
निवेदनावर शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, शहराध्यक्षा मीनाताई करंजवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




















