ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मोठे बळ, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेकडून स्वागत – संदीप श्रीपाद बेलसरे

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आल्याने उद्योगजगतामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप श्रीपाद बेलसरे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

या अर्थसंकल्पात कौशल्य विकास, निर्यात वाढ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानवृद्धी यांना प्राधान्य देण्यात आले असून, प्राप्तिकर सवलत व नवीन वाहन खरेदीसाठी कर सवलत न दिल्यामुळे अर्थसंकल्प संतुलित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
बजेटमध्ये देशभरातील २०० औद्योगिक क्लस्टरच्या पुनर्जीवनासाठी योजना सादर करण्यात आली असून, त्यामुळे उद्योगांची स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच ‘चॅम्पियन’ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घडवण्यासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे.
भविष्यातील चॅम्पियन उद्योगांच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर भारत फंडामध्ये २,००० कोटी रुपयांचे अतिरिक्त योगदान देण्यात येणार असून, त्यासोबतच १०,००० कोटी रुपयांचा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग ग्रोथ फंड उभारण्यात येणार आहे. यामुळे नव्या उद्योगांना भांडवल उपलब्ध होऊन त्यांची प्रगती वेगाने होईल.

व्यापार देयक सवलत प्रणालीमुळे उद्योगांची देयके ४५ दिवसांत मिळणार असून, ही प्रणाली वापरण्यासाठी सर्व उद्योगांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, पातळी-२ व पातळी-३ शहरांमध्ये ‘कॉर्पोरेट मित्र’ गटाच्या विकासामुळे लहान शहरांतील उद्योगांच्या वाढीस चालना मिळणार आहे.
तरुणांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे कौशल्यसंपन्न मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, डिझाईन क्षेत्रासाठी नवीन राष्ट्रीय डिझाईन संस्था स्थापन करण्याचा निर्णयही स्वागतार्ह असल्याचे सांगण्यात आले.
सेमीकंडक्टर उद्योगासाठी ४०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे भविष्यात भारतीय वाहन उद्योग आत्मनिर्भर होईल, असा विश्वास उद्योग संघटनांनी व्यक्त केला आहे. तसेच मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या दोन उच्चगती रेल्वे मार्गांच्या घोषणेमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.
एकूणच या आणि मागील अर्थसंकल्पातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र अधिक सक्षम होईल, अशी भावना उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button