साहित्य अकादमीच्यावतीने अभिजात मराठी भाषा परिसंवादाचे इंद्रायणी महाविद्यालयात आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत सरकारची स्वायत्त संस्था असलेल्या साहित्य अकादमी व तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्तपणे ‘लोकरंगभूमी आणि अभिजात मराठी’ विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद इंद्रायणी महाविद्यालयाच्या कांतीलाल शहा सभागृहात येत्या २८ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हा होणार आहे.
या परिसंवादाचे उद्घाटन पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश अवलगावकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील असणार आहेत. स्वागत साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नायर, तर प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ नाटककार पद्मश्री वामन केंद्रे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. बीजभाषण ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे करणार आहेत.
या परिसंवादातील पहिले सत्र विधीनाट्य व भक्तीनाट्याची रंगभाषा आणि अभिजात मराठी विषयावर होणार असून, या सत्राचे अध्यक्षपद संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अनिल सहस्रबुद्धे भूषविणार आहेत. यावेळी लोकसाहित्याचे अभ्यासक मुकुंद कुळे व संतोष शेणई यांचे निबंध वाचन होणार आहे.
दुसऱ्या सत्रात ‘वगनाट्य, लोकनाट्य व तमाशाची रंगभाषा व अभिजात मराठी’ या विषयावर विवेचन होणार असून, डॉ. प्रकाश खांडगे या सत्राचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख व नामवंत लोककलाकार डॉ. गणेश चंदनशिवे, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ व सोपान खुडे यांचे निबंध वाचन होणार आहे.
या परिसंवादाचा अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.












