ताज्या घडामोडीपिंपरी

प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा ब्रँड अँबेसिडर – सचिन इटकर 

मराठी प्रोफेशनल्सच्या वतीने दुबई मध्ये घुमला ‘जय जय महाराष्ट्र माझा‌’ चा नारा

Spread the love
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. आज महाराष्ट्र देशामध्ये शेती, शिक्षण, उद्योग क्षेत्रासह अनेक क्षेत्रात प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याच्या या सर्वांगीण प्रगतीमध्ये देश, परदेशात विखुरलेल्या मराठी जणांचे योगदान उल्लेखनीय आहे. उद्योग, रोजगार निमित्त दुबई मध्ये स्थायिक झालेला प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्राचा ब्रँड अँबेसिडर आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर यांनी केले.
  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दुबई येथे रविवारी (दि.४ मे) मराठी प्रोफेशनल्स या संस्थेच्या वतीने ‘जय जय महाराष्ट्र माझा‌’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुबई जल आणि विद्युत विभाग व्यवस्थापक आणि दुबई प्रोफेशनल या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मूळ बेळगाव निवासी सोमनाथ पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे मार्केटिंग प्रमुख जमीर मुल्ला, रवींद्र देशमुख, इंद्रजीत शिंदे, अतुल विसपुते, रवींद्र देसाई, नारायण तिवारी, सनी सुतार, निखिल जोशी, चंद्रशेखर जाधव, शिवाजी पाटील, विठोबा अहेर, अमित भोसले, शेखर दिवाडकर, नितीन जाधव, सदानंद भोयर, विजय कदम, मेनका जोशी आदींसह दुबईमधील मराठी अधिकारी, उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.
   महाराष्ट्राच्या शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, सहकार, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रातील प्रगती मध्ये सर्व मराठी जनांचे योगदान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गरुड भरारी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ सुसज्ज आहे असेही इटकर यांनी यावेळी सांगितले.
   या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेबरोबरच लोकसंस्कृतीचे आणि वारशाचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमातून स्थानिक मराठी नागरिकांनी घडविले. महाराष्ट्र गीताबरोबरच यूएई आणि भारताचे राष्ट्रगीत सादर करून एकात्मतेचा संदेश देण्यात आला. २०० पेक्षा जास्त कुटुंबे यात सहभागी झाली होती. युवती व महिलांनी ढोल, झांज वाजवून सर्वांचे स्वागत केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करत भजन, लोकगीते, कोळीगीते, लावणी या प्रसंगी सादर करण्यात आली.
  सोमनाथ पाटील म्हणाले की, ज्या गावातून आपण येथे आलो आहोत, त्या गावातील तरुणांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी योगदान द्यावे. येथून पुढे दुबईत दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जाईल आणि मराठी प्रोफेशनल्स आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ मराठी माणसाच्या उन्नतीसाठी एक सेतू म्हणून काम करेल.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button