ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
प्रयत्न केले तरच मिळेल यश – अश्विनी मट्टू
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये 'आरंभ २०२५' व्दारे नवीन शैक्षणिक वर्षास सुरूवात

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्यात प्रयत्न केले तरच समोर आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करून यश संपादन करता येईल. अन्यथा अनेक संधी हातून सुटून जातील. समोर आलेले आव्हान आपल्याला सिध्द करण्यासाठी मिळालेली ही एक मोठी संधी आहे, असा विचार करून बारकाईने अभ्यास करत संधीचे सोने करा, असे मार्गदर्शन टाटा इव्हीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अश्विनी मट्टू यांनी विद्यार्थ्यांना केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या २०२५-२७ या नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ‘आरंभ – २०२५’ या कार्यक्रमाद्वारे स्वागत करण्यात आले. यावेळी मट्टू यांनी ‘लिडरशीप इन ए चेंजिंग वल्ड’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रेव्ह्युलेशन टेक्स ॲण्ड फाऊंडर मिथ्या ४ डी स्टेशनरीचे श्रीकांत झावर, बजाज फायनान्स लि. चे एचआर आणि व्यवस्थापन प्रमुख थॉमस ऑगस्टीन, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.
एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक गुणवत्ता विकसित करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. प्राध्यापक, कर्मचारी मदतीसाठी तत्पर असतात. अल्पावधीतच दर्जेदार उच्च शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. पीसीईटी विश्वस्त मंडळाच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली संस्था प्रगती करत आहे, असे डॉ. किर्ती धारवाडकर यांनी सांगितले.
श्रीकांत झावर यांनी ‘दी पॉवर ऑफ ग्रोथ माईंड सेट’ या विषयावर मार्गदर्शन केले. काही व्यक्ती आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार नसतात. आहे त्या परिस्थितीत सुरक्षित राहण्याचा मार्ग निवडतात. परंतु प्रगती करायची असेल तर समस्येला तोंड देत उत्तरे शोधून यश संपादन करता येते, असे झावर यांनी सांगितले.
आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट करा. विचार करा, प्रश्न विचारत रहा, म्हणजे तुम्ही पुढील आयुष्यात उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल कराल, असे थॉमस ऑगस्टीन यांनी ‘ट्रान्झिक्टिंग फ्रॉम कॅम्पस लाईफ टू कार्पोरेट वर्ल्ड’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले. यानंतर प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रश्न, शंकांचे निरसन केले.
दूपारच्या सत्रात युएसव्ही प्रा. लि. चे थंबूराज अंतूवन, टॅलेंट रिसोर्सेसच्या जूही गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी पालक उपस्थित होते.
सूत्रसंचालन आणि आभार डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी मानले.













