रुपी नगर येथे कृषी बाजारपेठ व अन्नप्रक्रिया उत्पादनांवर प्रशिक्षण कार्यक्रम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय उद्यमिता विकास संस्था (EDII) व अॅक्सेंचर तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने रुपी नगर,पुणे येथे मायक्रो स्किलप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम (MSDP) अंतर्गत कृषी, बाजारपेठ व अन्नप्रक्रिया उत्पादनांवरील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. हा प्रशिक्षण उपक्रम 03 सप्टेंबर ते 03 ऑक्टोबर 2025 पर्यंत राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मा.नगरसेवक शांताराम बापू भालेकर, भगवान हरकळ ( EDII Manager) ज्योती हेलवे,( एरिया को-ऑर्डिनेटर माविम) अमृता गोडसे ( मास्टर ट्रेनर)यांनी सहभागी महिलांना प्रमाणपत्रे प्रदान केली.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबन, उद्यमशीलता व स्थानिक रोजगारनिर्मिती याकडे प्रवृत्त करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान महिलांना व्यवसाय नियोजन, वित्त व्यवस्थापन, विपणन कौशल्य, गुणवत्ता नियंत्रण तसेच आधुनिक अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
सहभागी महिलांनी या काळात विविध उद्योजकीय कल्पना मांडल्या आणि स्वतःची उत्पादने बाजारपेठेत आणण्याचा संकल्प केला.
माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी सांगितले की, अशा प्रकारचे प्रशिक्षण महिलांच्या आत्मविश्वासात भर घालते, जीवनमान उंचावते आणि समाजात त्यांचा सक्रीय सहभाग वाढवते. तसेच त्यांनी शासकीय योजना, स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर, उत्पादनांचे मूल्यवर्धन व विपणनाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.













