ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोअर कमिटीची पहिली बैठक पार; पिंपरी-चिंचवडमध्ये आज रोहिणी खडसे

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरात निवडणूक तयारीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या प्रदेशस्तरीय नेतृत्वाने काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या कोअर कमिटीची पहिली बैठक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

बैठकीनंतर बोलताना पानसरे म्हणाले, “कोअर कमिटीमार्फत आम्ही निवडणूक नियोजनाच्या घड्याळाला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात पक्ष संघटनेतील इच्छुक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार असून, त्यानंतर पक्षाबाहेरील इच्छुकांचे अर्ज मागवले जातील. यासाठी विधानसभानिहाय दोन आणि शहर स्तरावर दोन असे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत.” संकलित अर्जांच्या आधारे निवडणुकीची पुढील रूपरेषा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात झालेला “भोंगळपणा” थांबविण्याची गरज असल्याचे सांगत पानसरे यांनी शहर उभारणीमध्ये शरद पवार यांची ऐतिहासिक भूमिका अधोरेखित केली. “पिंपरी-चिंचवड पुन्हा योग्य दिशेला नेण्यासाठी आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनात नव्या उत्साहाने काम सुरू केले आहे,” असे ते म्हणाले.

कोअर कमिटीच्या बैठकीस बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. काहीजण कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांनी पूर्वकल्पना देऊन गैरहजेरी नोंदवली होती. प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे, रोहित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिली.

दरम्यान, मार्गदर्शनासाठी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आज पिंपरी-चिंचवडमध्ये येणार असून, चिंचवड गावातील विरंगुळा केंद्र येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक होणार आहे.

विधानसभा निहाय अर्ज स्वीकृती प्रतिनिधी

शहर: तुषार कामठे, देवेंद्र तायडे

भोसरी: काशिनाथ जगताप, इम्रान शेख

पिंपरी: सुलक्षणा शिलवंत, संदीप चव्हाण

चिंचवड: सुनिल गव्हाणे, तुषार कामठे. इच्छुक उमेदवारांनी सदर पदाधिकाऱ्यांकडे आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शहर सरचिटणीस जयंत शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button