बारावीचा निकाल जाहीर : यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल साेमवारी जाहीर केला असून, राज्यात पुन्हा एकदा काेकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षापेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे, मुलांपेक्षा मुलीच हुशार, हे स्पष्ट झाले. मुलांच्या तुलनेत मुली ५.०७ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी याबाबत माहिती दिली. नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते, त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखा वगळता विज्ञान, कला आणि व्यवसाय या तिन्ही शाखेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. कला शाखेचा निकाल तब्बल ५ टक्क्यांनी घसरला आहे.













