ताज्या घडामोडीपिंपरी

‘रेशीमबंध’ म्हणजे आत्मकथनात्मक आनंदाचा पेटारा होय!’ – प्रा. तुकाराम पाटील

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ”रेशीमबंध’ म्हणजे आत्मकथनात्मक आनंदाचा पेटारा होय!’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी  निगडी प्राधिकरणातील दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेतील ग्रंथदालनात व्यक्त केले.

ज्येष्ठ लेखिका प्रज्ञा घोडके लिखित ‘रेशीमबंध’ या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. तुकाराम पाटील बोलत होते. माजी उपमहापौर शैलजा मोरे, ज्येष्ठ लेखिका रजनी अहेरराव, डॉ. मानसी हराळे, सामाजिक कार्यकर्त्या राधिका बोर्लीकर, सुहास पोफळे, चंद्रकांत शेडगे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. तुकाराम पाटील पुढे म्हणाले की, ‘प्रज्ञा घोडके यांचे अनुभवविश्व विशाल आहे. गणगोत, आप्तेष्ट यांनी ते भरलेले आहे. त्यांच्याशी असलेल्या सुखदुःख, कृतज्ञता, सेवाभाव या भावभावनांचे दर्शन वाचकाला त्यांच्या लघुकथांच्या माध्यमातून नकळतपणे होते!’ शैलजा मोरे यांनी, ‘स्त्रियांनी आपले अनुभव लेखनातून मांडले पाहिजे; कारण त्यातून समाजाला दिशादर्शन होते!’ असे मत व्यक्त केले. रजनी अहेरराव यांनी, ‘मन हे सुखदुःखाच्या पलीकडे गेले की, एक निर्मळ शुद्ध स्वरूप त्याला प्राप्त होते. ‘रेशीमबंध’मधील लघुकथा हे अशाच निर्मळ चिंतनाचे अक्षररूप आहे!’ असे विचार व्यक्त केले. लेखिका प्रज्ञा घोडके यांनी, ‘आजपर्यंत मी कविता आणि ललितलेखन विपुल प्रमाणात केले असले तरी ‘रेशीमबंध’ हा माझा पहिलाच लघुकथासंग्रह आहे. माझे आईवडील शिक्षक असल्याने मी अनेक गावं पाहिली तसेच अनेक माणसं मनात घर करून राहिली आहेत. त्यातील व्यामिश्र अनुभवांचे संचित या लघुकथांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या. राज अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button