पिंपरी चिंचवड शहरातील उज्ज्वल भविष्यासाठी अरविंद केजरीवाल यांना आमंत्रण – शहराध्यक्ष रविराज काळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या नागरिक समस्या, शैक्षणिक व आरोग्यविषयक आव्हानांचा आढावा घेण्यासाठी तसेच शहराच्या शाश्वत विकासासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना पिंपरी चिंचवड शहरात येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
हे आमंत्रण आम आदमी पक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी अधिकृतरित्या दिले असून, लवकरच अरविंद केजरीवाल यांची भेट पिंपरी चिंचवड शहरात आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रसगी आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या ‘कार्य अहवाल’ या पुस्तिकेचे प्रकाशन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते गोवा येथे पार पडले. या ‘कार्य अहवाल’ पुस्तिकेत रविराज काळे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या जनसेवा, नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी घेतलेले पुढाकार, आंदोलनात्मक लढे, तसेच सामाजिक-सांस्कृतिक कार्याचे सविस्तर चित्रण केले आहे.
विशेष म्हणजे, या अहवालातून पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्र. २६ (पिंपळे निलख, विशालनगर) मध्ये केलेल्या विविध विकासकामांचे, आंदोलनांचे, आणि सामाजिक -सांस्कृतिक उपक्रमांचे सचित्र दर्शन घडते.
रविराज काळे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील नागरिकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्यसेवा आणि स्वच्छ प्रशासन मिळावे, हे आमचे ध्येय आहे. दिल्लीतील मॉडेलप्रमाणे पारदर्शक आणि नागरिककेंद्रित विकासाचे आराखडे येथे राबविण्यासाठी आम्ही केजरीवाल साहेबांचे मार्गदर्शन घेऊ.” तसेच हा कार्य अहवाल म्हणजे माझ्या एकट्याच्या कार्याचा नव्हे, तर प्रत्येक ‘आप’ कार्यकर्त्याच्या अथक प्रयत्नांचा साक्षी आहे. आम आदमी पार्टीचा हेतू लोकशाहीला नागरिकांच्या दारात आणणे आणि विकासाला जनसहभागातून गती देणे हा आहे.
पिंपरी, चिंचवड, रहाटणी, विशालनगर, पिंपळे निलख या परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये या भेटीबद्दल मोठी उत्सुकता असून, नागरिकांच्या समस्या आणि स्थानिक मागण्यांवर केजरीवाल साहेब मार्गदर्शन करणार असल्याचे रविराज काळे यांनी सांगितले.













