राखीच्या धाग्याने विणला ‘सुरक्षेचा विश्वास’! विद्यार्थिनींकडून अग्निशमन विभागासाठी अनोखा रक्षाबंधन सोहळा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन दिवस पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन विभागासाठी खास ठरला आहे. यावर्षी अग्निशमन विभागाच्या पिंपरी येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील जवानांना, चिखली येथील इनोव्हेशन वर्ल्ड स्कूल या शाळेच्या इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.
अग्निशमन केंद्राच्या मुख्यालयात आयोजित या विशेष उपक्रमात शाळेच्या ४ ते ८ वयोगटातील सुमारे २० चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यावेळी “ये रक्षाबंधन सबसे बडा त्योहार है” हे गाणं म्हणत, जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. या छोट्याशा हृदयस्पर्शी उपक्रमामुळे उपस्थित सर्वजण भारावून गेले.
मुलांमध्ये समाजासाठी कार्य करणाऱ्यांविषयी आदराची भावना लहानपणापासून रुजावी, या उद्देशाने या उपक्रमाची कल्पना साकारली गेली. पालक आणि विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सण साजरा करणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू नव्हताच, तर समाजात खऱ्या अर्थाने रक्षण करणाऱ्या जवानांना सलाम करणे, त्यांच्या कार्याची ओळख मुलांना करून देणे आणि त्यांच्याशी भावनिक नातं निर्माण करणे हा मुख्य हेतू होता, असे शाळेच्या शिक्षिकांनी सांगितले.
यावेळी मुलांनी उपस्थित अग्निशामक जवानांना “तुम्ही आग कशी विझवता?”, “घाबरत नाही का?”, “तुमचं कुटुंब कुठे आहे?” यांसारखे प्रश्न विचारले. अग्निशामक जवानांनी या लहानग्या मुलींसोबत संवाद साधला आणि त्यांना भेटवस्तूही दिल्या.
राखी ही फक्त भावनिक नात्याची खूण नाही, तर समाजातील रक्षकांप्रती असलेली कृतज्ञता आणि जिव्हाळ्याचं प्रतीक आहे. जेव्हा ती आपल्या अग्निशमन जवानांच्या हातावर बांधली जाते, तेव्हा ती सामाजिक जबाबदारीचा धागा ठरतो. लहान मुलांनी आपत्कालीन सेवा देणाऱ्या जवानांना बांधलेली राखी ही सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे. हा क्षण संपूर्ण विभागासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला आहे.
उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
या चिमुकल्यांनी आमच्या केंद्रात येऊन रक्षाबंधन साजरे केले. रोज मृत्यूच्या सावलीत काम करणाऱ्या आमच्या जवानांसाठी ही राखी म्हणजे प्रेरणेचा, प्रेमाचा आणि जबाबदारीचा नवा धागा आहे. असे उपक्रम केवळ जवानांचे मनोबल वाढवत नाहीत, तर समाजात आपत्कालीन सेवांबाबत जागरूकता आणि आदरही निर्माण करतात.
संतोष सरोटे, वरिष्ठ अग्निशामक जवान, पिंपरी चिंचवड महापालिका
मुलांच्या निरागस गप्पा आणि त्यांच्या डोळ्यांत झळकणारी चमक ही आमच्यासाठी सर्वात मोठी भेट होती. त्यांच्या प्रश्नांमधून आम्हालाही आमचं काम नव्याने समजायला मदत झाली. आम्ही दररोज जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतो, पण आज ज्या प्रेमाने या चिमुकल्या मुलींनी आमच्या मनगटावर राखी बांधली, त्याने आम्हाला खूप छान वाटलं.
भूषण येवले, अग्निशमन जवान, पिंपरी चिंचवड महापालिका








