नाला तुंबून पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात; सफाईवेळी नाल्यातुन निघाला ट्रॅक्टरभर गाळ!
माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी दाखविली तत्परता

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रहाटणी प्रभागातील गाळयुक्त नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांवर तळे साचून पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. मात्र मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि मा. स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांनी तातडीने तत्परता दाखवून महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने नाल्याची सफाई करून गाळ काढल्यानंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली.
रहाटणी येथील नाल्यांची अनेक दिवसांपासून सफाई करण्यात न आल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचला आहे. परिणामी शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रहाटणीतील श्रीनगर येथील नाल्यातील पाणी थेट रस्त्यावर आणि सज्जनगड कॉलनी व सिंहगड कॉलनीतील नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल आणि गैरसोय झाली.
याबाबत माहिती मिळताच माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि गोपाळ माळेकर या दोघांनीही महापालिकेचे सहायक आयुक्त किशोर ननावरे तसेच स्थापत्य विभागाचे अभियंता नितीन निंबाळकर, उपअभियंता मनोज बोरसे, कनिष्ठ अभियंता अमित पवार, ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता धनाजी नखाते आरोग्य अधिकारी कुंडलिक दरोडे यांच्यासह सदर नाल्याची पाहणी करून तातडीने नाल्याची सफाई करून घेतली.
आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट नाल्यात उतरून नाल्याची सफाई केली. या सफाईत नाल्यातून तब्बल एक ट्रॅक्टर भरून गाळ आणि कचरा काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. या साचलेल्या गाळमुळेच नाला तुंबून ते पाणी थेट रस्त्यावर आले होते. अखेर नाला सफाई करून घेतल्यानंतर त्रिभुवन यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नाला सफाई करून घेतल्याबद्दल त्रिभुवन आणि माळेकर यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, प्रभागातील इतरही भागांची पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी पाणी साचेल किंवा तुंबणार आहे अशा ठिकाणांची तातडीने सफाई करून घेण्याच्या सूचना; त्रिभुवन यांनी महापालिका प्रशासनाला यावेळी दिले.










