रहाटणीत बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आणि प्रशासनाला अधिक लोकाभिमुख व गतिमान बनविण्यासाठी उद्या बुधवार दि.३० जुलै रोजी रहाटणी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांद्वारे शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी केले आहे.
रहाटणी येथील विमल गार्डन मंगल कार्यालय येथे बुधवार दि.३० रोजी सकाळी ११ वाजता या शिबिराचा शुभारंभ होणार आहे. पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाअंतर्गत हे शिबीर घेण्यात येत असून यामध्ये तलाठी दाखले, मंडल अधिकारी रिपोर्ट, तहसील उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, रहिवासी दाखले, नवीन आधार कार्ड, व आधार कार्ड अद्यावत करणे, रेशन कार्ड ऑनलाइन काढणे, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना, ऑनलाईन सातबारा, व फेरफार वाटप, वारस नोंद, ई-हक्कामधून करणे. तसेच सर्व शासकीय दाखले एकाच छताखाली मिळणार आहे.
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार मनीषा माने, मंडळ अधिकारी अश्विनी गायकवाड, तलाठी प्रीती साळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.















