माणसांनी मुक्त होऊन व्यक्त व्हावं – हभप पुरुषोत्तम महाराज पाटील
आळंदीत ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाढत्या स्पर्धेच्या युगातील दैनंदिन जीवन जगत असतांना माणसांनी मुक्त होऊन जगावं… आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने योग्य जीवन शैलीचा वापर करावा… मात्र मुक्त होऊन व्यक्त व्हावं असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, शिवनेर भूषण, शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे सर यांच्या ७८ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना हभप पुरुषोत्तम महाराज पाटील बोलत होते. या प्रसंगी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना संचालिका श्रीमती नीलमताई तांबे, सचिव वैभव तांबे, खजिनदार मयुर ढमाले, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष तथा पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक विशाल तांबे, माजी नगरसेवक विलास घुंडरे, श्रीधर कुऱ्हाडे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे आजीव विश्वस्त अशोक आबा कुऱ्हाडे, सचिव अजित वडगावकर, चेअरमन ज्ञानेश्वर घुंडरे, माजी नगरसेविका मालन घुंडरे पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे पाटील, उपप्राचार्य पांडुरंग मिसाळ आदींसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
कृतज्ञता सोहळ्याचे प्रारंभी श्री गजानन महाराज व स्व. विलासराव तांबे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे म्हणाले, संस्थापक अध्यक्ष स्व.विलासराव तांबे यांनी दिलेल्या संस्कारा नुसार व त्यांच्या आचार विचारांना अधिन राहून संस्थेचे कार्य सुरु आहे. महिलां साठी शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण या ध्येयाने स्व, विलासराव तांबे सरांनी ही शैक्षणिक संस्था सुरु केली. या संस्थेत के.जी पासून ते पी. जी. पर्यंत सुमारे पंधरा हजारा पेक्षा अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचा वारसा आणि वसा पुढे नेण्याचे कार्य अधिक प्रभावी पणे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अलंकापुरीत ज्ञानविलास कृतज्ञता गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने ज्ञान विलास कृतज्ञता गौरव पुरस्कार 2025 वितरण सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. संजय देवकर यांनी गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याची माहिती दिली. या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा विशाल तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ज्ञानविरास कृतज्ञता गौरव पुरस्कारार्थींचा परिचय संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी करून देत कार्याचा गौरव केला. यात प्राचार्य के एस पाटील, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, मरणोत्तर स्व. बबन तळेकर यांना कृतज्ञता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, प्राचार्य के एस पाटील यांनी पुरस्कार स्वीकारत मनोगते व्यक्त करून आपले संस्थेच्या प्रती असलेले ऋणानुबंध सांगत मनमोकळे केले. यावेळी डॉ. सोनाली देवळे, डॉ. संजीव कांबळे, नीलम येवले या पीएचडी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. संजय देवकर यांनी केले. पसायदान व आभार डॉ. उपप्राचार्य पांडुरंग मिसाळ यांनी मानले.














