वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्र प्रदर्शनास सुरुवात
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टीव्हल चा स्तुत्य उपक्रम

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेशोत्सवानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टीव्हल यांच्या वतीने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे तीनशे छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरवण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. खासदार प्रणिती शिंदे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲड. अभय छाजेड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, सचिन आडेकर, आबा जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
उल्हासदादा पवार म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. हा फेस्टिव्हल आज जगभरात पोहोचला आहे. छायाचित्रांचे महत्त्व आजही तेवढेच आहे. पुणे फेस्टिव्हलने हे प्रदर्शन भरविले, हे कौतुकास्पद आहे.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. छायाचित्रांमुळे आपल्या देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. तो इतिहास जपण्याची आणि टिपण्याची मोठी जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे.
प्रा. डॉ. पराग काळकर, ॲड. अभय छाजेड यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन प्रेस फोटोग्राफरचे कौतुक केले. हे छायाचित्र प्रदर्शन ३० ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे अशी माहिती पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी दिली.















