ग्रंथ, ग्रंथपाल आणि वाचक यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ग्रंथालय- डॉ. अशोक कुमार पगारिया
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन संपन्न

भोसरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयामध्ये भारतातील ग्रंथालयाचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या जन्मदिनानिमित्त संपन्न करण्यात येणारा “ग्रंथपाल दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी डॉ एस. आर .रंगनाथन यांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन करून त्यांच्या ग्रंथालयाचे संदर्भातील कामगिरी ची माहिती दिली,प्रा पगारिया म्हणाले,”डॉ रंगनाथन हे भारतीय ग्रंथालय संस्कृती चे जनक असून ते गणितज्ञ आणि पुस्तकालय तज्ञ होते .त्यांचे ग्रंथालयाच्या विकासामध्ये फार मोठे योगदान आहे.
ग्रंथ, ग्रंथपाल आणि वाचक यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ग्रंथालय. शिक्षणामध्ये वाचनाचे फार महत्व आहे,वाचनाशिवाय अभ्यास नाही, अभ्यासाशिवाय ज्ञानार्जन नाही. या क्षेत्रात” वाचाल तरच वाचाल”. उच्च विद्या विभुषित होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे.त्यासाठी ग्रंथालयाची आवश्यकता असते.”या वेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे, ग्रंथपाल राजेश कुंभार, नॅक समन्वयक प्रा प्रवीण म्हस्के, उपस्थित होते,..यावेळी डॉ विजय निकम,प्रा सचीन पवार ,प्रा प्रवीण म्हस्के, प्रा विभा ब्राह्मणकर यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली,त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाचन करून कार्यक्रमाची सांगता केली, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी ग्रंथपाल राजेश कुंभार यांनी आभार मानले.













