चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलला ‘इंडिया के – १२ पुरस्कार २०२५ ने सन्मानित

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलला पुणे येथे एल्ड्रॉक इंडिया या नामांकित संस्थेतर्फे “ अभिनव अध्यापन पध्दतीचा अवलंब करणे ” या श्रेणीत ‘ इंडिया के – १२ पुरस्कार २०२५ ’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हा पुरस्कार येथील शाळेत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणासाठी दिला गेला आहे. हा पुरस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा जोशी यांनी पुणे शहरातील कल्याणी नगर येथे शाळेच्या वतीने स्वीकारला.
समारंभात उपस्थित प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांनी देखील कमला एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचे कौतुक करत, इतर शाळांसाठी आदर्श ठरल्याचे सांगितले. या पुरस्कारामुळे शाळेची प्रतिष्ठा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य शाळा म्हणून आणखी उंचावली असून, विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. यासोबतच, कमला एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाला त्यांच्या अनमोल योगदानाबद्दल हार्दिक अभिनंदन व्यक्त करण्यात आले.
प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्या प्रित्यर्थ कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ . दीपक शहा , खजिनदार डॉ . भूपाली शहा , संचालिका डॉ . तेजल शहा यांनी मुक्तकंठाने शाळेच्या मुख्याध्यापिका वृंदा जोशी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांचे विशेष सत्कार करून अभिनंदन केले . व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.













