विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणातून अनुभव आत्मसात करावा – डॉ.दीपक शाह

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या इंटर्नशीप कमिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात रोजगार प्रशिक्षण जनजागृती मोहीम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त सहायक आयुक्त अण्णा बोधडे, संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा, डिंपल शहा , प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, डॉं. जयश्री मुळे , डॉ .हर्षिता वाच्छानी , आदी मान्यवर उपस्थितांसमवेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी विविध कंपन्याचे मनुष्यबळ विभागाचे उच्च अधिकारी, कार्यकारी महाव्यवस्थापक, विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. त्यांच्या डॉ दीपक शहा, डॉ. तेजल शहा , डॉ . क्षितीजा गांधी , डॉ. राजेंद्र कांकरीया याच्या हस्ते भेटवस्तू देवून यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा पुढे म्हणाले, विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकाद्वारे मर्यादित कालावधीसाठी, तीन ते सहा महिन्याचा विविध कंपनीत काम प्रशिक्षणातून मिळून प्रत्यक्ष अनुभव मिळावा. त्याना नवीन गोष्टी आत्मसात करता याव्यात. प्रत्यक्ष कामाचे स्वरूप प्रशिक्षण काळात समजावून घेऊन ते कृतीरुपी करता यावे. जेणेकरून त्यांच्या आत्मविश्वास वाढावा. कंपनीत व्यवहार कसे होतात , नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी .या उदात्त हेतूने विविध कंपन्यातील मनुष्यबळ विभागाचे, तज्ञाचे, मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी रोजगार प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना उद्देशून पुढे म्हणाले, तुम्ही शिकावे हीच आमची मनीषा आहे. कष्टाची तयारी ठेवा. विविध क्षेत्रातील तज्ञ, मार्गदर्शक जे मार्गदर्शन करणार आहे. त्यांच्या लाभ घ्यावा .भावी काळात इंटर्नशीप मध्ये ज्यांना रोजगार प्रशिक्षणाची संधी मिळेल , त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन शेवटी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त सहायक आयुक्त अण्णा बोधडे म्हणाले, अल्पकाळात पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने झाला. औद्योगिक नगरीत शिक्षणाची गरज ओळखून डॉ. दीपक शहा व त्यांच्या प्राध्यापक वर्गांनी अल्पावधीतच दर्जेदार गुणवत्तापूर्वक शिक्षण देत आज सुमारे साडेआठ हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. शहराच्या जडणघडणाची माहिती विद्यार्थ्यांना देत ते पुढे म्हणाले, जग पुढे जात आहे .प्रचंड स्पर्धा आहे .कष्टाशिवाय पर्याय नाही .यशस्वी होण्यासाठी पदवी घेऊन त्या क्षेत्रात प्रत्यक्ष कृतीरूपी काम करता आले तरच स्वतःचे स्थान निर्माण करता येईल. त्यासाठी पदवी पूर्ण करतानाच प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. त्याकडे प्रत्येकाने लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
उपस्थित विविध कंपन्यातील मनुष्यबळ विभागातील उच्च अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले , मुलाखतीच्या वेळी इंग्रजी भाषेचे न्यूनगंड बाळगू नका. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून खचूनही जाऊ नका . स्वतःवर आत्मविश्वास बाळगा. मुलाखती मध्ये दुसऱ्याच्या विश्वास संपादन करावयाचा असतो ही गोष्ट लक्षात ठेवा. पदवी घेतली म्हणजे झाले असे होत नसून यशस्वी होण्यासाठी शिक्षण शेवटच्या श्वासापर्यंत घ्यावे लागते. मुलाखतीसाठी अर्ज करताना जे लिहिता त्याबद्दल सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा मुलाखत घेणारे त्या आधारेच प्रश्न विचारतात. मुलाखतीत बोलताना आत्मविश्वासपूर्वक संभाषण करावे. कामाला लागलाच तर जे काम दिले जाईल, ते अचूकपणे करणे महत्त्वाचे असून वेळेत काम पूर्ण करा. असे सांगून अर्ज कसा करावा, मुलाखत कशी द्यावी याबाबत विविध कंपन्यातील मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक, तज्ञ , राजेंद्र कांबळे, महिंद्र पानशे, जितेंद्र सोनार, शंकर साळुंखे, निलेश माटे, अम्रिता कळंबळेकर, अनुराग तापकीर आदींनी सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व विविध शंकांचे समर्पकपणे निरसन केले.
कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत इंटर्नशीप समितीच्या समन्वयीका प्रा. सुवर्णा गोगटे, प्रा. रसिका पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी तर आभार प्रा. दिपाली महाजन यांनी मानले .














