ज्युनियर रोल बॉल विश्वचषक विजेती कर्णधार प्रांजल जाधव हिचा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सत्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय ज्युनियर रोल बॉल विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या, पिंपरी-चिंचवडची कन्या प्रांजल जाधव हिचा पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कासारवाडी येथे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. नैरोबी, केनिया येथे २२ ते २९ जून दरम्यान झालेलया “ज्युनियर रोल बॉल विश्वचषक २०२५” स्पर्धेत भारतीय महिला संघाने जागतिक विजेतेपद पटकावून देशाचे नाव उज्ज्वल केले असून, या संघाची कर्णधार म्हणून प्रांजल जाधवने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे.
विशेष म्हणजे, या संघाची कर्णधार प्रांजल जाधव ही पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी असून, तिच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने अभिमानाने मान उंचावली आहे. १७ वर्षांखालील महिला गटात भारतीय संघाने वर्चस्व सिद्ध करत सुवर्णपदक पटकावले. या अभूतपूर्व यशात प्रांजल जाधवचा सिंहाचा वाटा असून, ती ‘स्केट मास्टर्स क्लब, अजमेरा कॉलनी’ येथे प्रशिक्षण घेत आहे.
या सत्कार सोहळ्याला भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, सरचिटणीस विजय उर्फ शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रोल बॉल हा वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळ असून, तो बास्केटबॉल, स्केटिंग आणि बॉल हँडलिंग या तीन घटकांचा संगम आहे. या खेळाची संकल्पना डॉ. राजू दाभाडे यांनी २००२ मध्ये पुण्यात मांडली होती. ते आजही आंतरराष्ट्रीय महासंघाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. पहिला विश्वचषक २०११ मध्ये पुण्यात पार पडला होता.
या विजयी महिला संघात प्रांजलसह महाराष्ट्रातून प्राची गरजे, तिशा पंडित, जान्वी हेगडे यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, राजस्थानमधून तन्नु गोलाधा, सपना सियाक, आसाममधून धनीष्ता कश्यप, क्रिष्टी साहारिया, गुजरातहून जेलिशा कुम्भणे, श्रेया गोलाकिया, आणि तामिळनाडूतून अक्षिया नंधिनी व तिक्षणाश्री या खेळाडूंचा संघात समावेश होता. हेमांगी काळे आणि शैलेंद्र पोटनीस यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत संघाला विजयाचे शिखर गाठण्यास प्रेरित केले.
आज प्रांजल जाधव हिच्या घरी आणि शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. विशेष रॅली काढून तिच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तिच्या आई-वडिलांनीही तिच्या यशात मोलाची साथ दिली. पिंपरी-चिंचवड शहरासाठी आणि देशासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण असून, प्रांजल जाधवसह संपूर्ण संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.













