बंधुतेचा विचार करतो दुभंगणाऱ्या समाजाला सांधण्याचे काम – बंधुताचार्य प्रकाश रोकडे
डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. पांडुरंग भोसले यांचा सत्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जातीधर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याची ऊर्जा बंधुता देते. बंधुतेची कास धरल्याशिवाय समतेचे मूल्य रुजणार नाही. विषमतेचा अंधकार दूर व्हायचा असेल, तर बंधुता मनामनात रुजायला हवी. कारण दुभंगणाऱ्या समाजाला सांधायचे असेल, तर बंधुतेचा विचार प्रत्येकाने जपायला हवा,” असे प्रतिपादन बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले.
विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या वतीने पुढील महिन्यात आयोजिलेल्या बाराव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षपदी डॉ. अविनाश सांगोलेकर व स्वागताध्यक्षपदी डॉ. पांडुरंग भोसले यांची निवड झाल्याबद्दल काषाय प्रकाशन व बंधुता प्रकाशन यांच्या वतीने दोघांचाही जाहीर सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रा. शंकर आथरे, प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, बंधुता प्रकाशनाच्या मंदाकिनी रोकडे आदी उपस्थित होते.
प्रकाश रोकडे म्हणाले, “देशविदेशांतील सर्व भाषांतील साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याची क्षमता विश्वबंधुता साहित्यात आहे. म्हणूनच विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा आपला भारत देश महान आहे. सर्व साहित्य प्रवाहांचा मूळ उद्देश हा माणसा-माणसात बंधुभाव निर्माण करण्याचाच आहे. त्यासाठी बंधुतेची भाषा, बंधुतेची व्याख्या आणि त्याचे तत्वज्ञान अवगत करायला हवे.”
डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, “बंधुता ही कृतितून जगण्याची गोष्ट आहे. बंधुतेचे मूल्ये जनमानसात रुजावे, यासाठी आयुष्याची ५० वर्षे खर्ची घालणारे प्रकाश रोकडे व बंधुता परिवाराचे कार्य कौतुकास्पद आहे. बंधुतेचा विचार विश्वव्यापी असून, समाजामध्ये स्थैर्य टिकवायचे असेल, तर आपल्याला बंधुता जपायला हवी. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यातून बंधुतेचे महत्व अधोरेखित होते.”
डॉ. पांडुरंग भोसले यांनी आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या योगदानावर देशाचे भविष्य असते. भारतातील महापुरुषांनी आपल्यासमोर ठेवलेल्या आदर्शांवर वाटचाल करण्याची गरज आहे, असे सांगितले. प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. शंकर आथरे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. मंदाकिनी रोकडे यांनी आभार मानले.













