ताज्या घडामोडीपिंपरी

स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वराज्य व स्वभाषा जोपासणे प्रत्येक देशाची गरज – प्रा. डॉ. प्रदीप मस्के

Spread the love

इतिहास व राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित “बदलते भारतीय परराष्ट्र धोरण ” उदयोन्मुख प्रवाह, आव्हाने आणि संधी’’ या विषयावरती एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी “बदलते भारतीय परराष्ट्र धोरण : उदयोन्मुख प्रवाह, आव्हाने आणि संधी” या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती.या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन महेंद्र भारती, बाबा भारती प्रतिष्ठान पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर परिषदेचे बीजभाषक म्हणून प्रा. डॉ. प्रदीप मस्के, जी.जी. पॉय रायतूरकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, फार्मागुडी, गोवा यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक देशाने स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वराज्य व स्वभाषा जोपासली तरच देशाचा आर्थिक सामाजिक व राजकीय विकास होवू शकतो असा त्यांनी विचार मांडला. त्यामुळे भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली,भारतीय संस्कृती व भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले असल्याचे सांगितले.उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पांडुरंग भोसले यांनी भूषविले. या उद्घाटन सत्रात सर्व मान्यवरांच्या हस्ते संशोधन पत्रिकांच्या जर्नलचा प्रकाशन कार्यक्रम संपन्न झाला.

प्रथम सत्रात प्राध्यापक डॉ. दत्तात्रय वाबळे, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी “भारत आणि दक्षिण आशियाई देश”या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडले. यामध्ये त्यांनी स्वातंत्र्योत्तर कालखंडापासूनचा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेतला. अमेरिका, सोविएत रशिया यांच्या बरोबरचे भारताचे बदलते संबंध, शीतयुद्ध तसेच भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबरचे संघर्षाचे संबंध , अलिप्ततावादी धोरण, गुजराल सिद्धांत यासारख्या विविध विषयांना स्पर्श केला. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. श्रेया दाणी, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,लांडेवाडी, भोसरी, पुणे यांनी भूषविले.
यानंतरच्या सत्रात प्राध्यापक डॉ. दिनकर मुरकुटे, इतिहास अभ्यास मंडळ सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी “भारताचा वाढता प्रभाव : 1991 ते 2025” या विषयावर सविस्तर मनोगत व्यक्त केले. १९९१ नंतरच्या भारताच्या बदलत्या आर्थिक धोरणावरती भाष्य केले. तसेच आण्विक धोरणाच्या बाबतीत नो फर्स्ट युज पोलीसीचा स्वीकार केला. सध्या भारत महासत्ता व विश्वगुरु होण्याचे स्वप्न पाहत आहे परंतु भारताच्या अंतर्गत पातळीवरती भारताला बेकारी,बेरोजगारी,महागाई, दारिद्रय यासारख्या अंतर्गत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अंर्तगत समस्यांमध्ये गुरफटलेला देश आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा बाळगणे हे धोकादायक ठरू शकते,असे मत मांडले.

अंतिम सत्रात देशभरातून सहभागी संशोधक व प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध सादर केले. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ.संजय गायकवाड,राज्यशास्त्र विभाग व प्रा. रविंद्र पारधी इतिहास विभाग यांनी भूषविले. या परिषदेसाठी देशभरातून सुमारे ८० संशोधक व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. परिषदेचा समारोप प्राचार्य प्रो. डॉ. पांडुरंग भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ही राष्ट्रीय परिषद संपन्न करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य . डॉ. पांडुरंग भोसले यांनी मार्गदर्शन केले.

सदर परिषद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इतिहास विभाग प्रमुख प्रा. भाऊसाहेब सांगळे, प्रा. डॉ. बाळासाहेब देवकाते, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र पुजारी, प्रा. ओंकार डोंगरे, प्रा. मोनिका तुपे, प्रा. शुभदा दहिमिवाल, कला शाखेच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. कामयानी सुर्वे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सुहास निंबाळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या प्रो. डॉ. संगीता अहिवळे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. दत्तात्रेय हिंगणे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर यांनी मोलाचे योगदान दिले. अशा प्रकारे सदर परिषद अत्यंत यशस्वी व अभ्यासपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button