पीएमआरडीए कार्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी मुख्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव, भक्तीभावासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती व सजावटीसाठी नैसर्गिक फुलांना प्राधान्य देण्यात आले आहे. गुरुवारी ज्ञानप्रबोधिनीने पारंपरिक बर्ची नृत्य तसेच ढोल-ताश्याचे प्रात्यक्षिक सादर करून गणेशोत्सवाच्या उत्साहात भर घातली.
या गणेशोत्सवनिमित्त तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीने एकदिवसीय शिवकालीन शस्त्रे, चिलखते, अमुक्त आणि मुक्त शस्त्रे यांचे ऐतिहासिक प्रदर्शन पीएमआरडीएमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे रवींद्र जगदाळे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून शिवकालीन वारसा, युद्धकला आणि शस्त्रांची ओळख करून दिली. यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रदर्शनास भेट देऊन शस्त्रसंग्रहाचे निरीक्षण केले.
युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीत १२ गड किल्ल्यांचा समावेश केला असून त्यातील ११ किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत. याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने पीएमआरडीएमध्ये गणेशोत्सवानिमित्त फलकाद्वारे संबंधित गड किल्ल्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता रिनाज पठाण, मुख्य वित्तीय नियंत्रक पद्मश्री तळदेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.















