चाकणमधील अतिक्रमणावर ठोस कारवाई
पीएमआरडीएसह नगरपरिषद, एनएचएआयकडून संयुक्त कारवाईला प्रारंभ

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण एमआयडीसीसह परिसरातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून (दि. १०) नगरपरिषद, एनएचएआयकडून पोलीस बंदोबस्तात या भागातील ४० अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी प्रशासकीय यंत्रणेने स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण एमआयडीसीसह शहर परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई पुणे-नाशिक महामार्गावर चाकण- तळेगाव चौक, आंबेठाण चौक ते एकतानगर रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आली असून आज सायंकाळपर्यंत एकूण १५० अतिक्रमणे काढण्यात आली असून २१ होल्डिंग हटवण्यात आले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपल्या अतिक्रमणे काढून घ्यावी, अशा आशयाच्या नोटीसा पूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे.
या कारवाईमुळे संबंधित भागातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार असून पुणे- नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेबावीस मीटरच्या आतील अतिक्रमणे काढण्यात येत आहे. यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सह कार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे रवींद्र रांजणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकातील कर्मचारी उपस्थित होते.














