हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता खुला करण्यास पीएमआरडीएकडून प्रारंभ

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी, मान, मारुंजी भागातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलली असून अतिक्रमित रस्ते खुले करण्यास सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने अतिक्रमित असलेला हिंजवडी फेज २ – विप्रो सर्कल ते मारुंजी लक्ष्मी चौक दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता गुरुवारी (दि.३) वाहतुकीसाठी खुला करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला.
हिंजवडी तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील अतिक्रमणासह इतर काही ठिकाणी ओढे – नाल्यांतील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह परस्पर बदल / अडवल्याने संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने वाहतूक कोंडी तसेच नागरी समस्या सोडवण्यासाठी गुरुवारपासून पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरुवात करण्यात आली. यात काही वर्षांपासून अतिक्रमित बंद असलेला हिंजवडी फेज २ – विप्रो सर्कल ते मारुंजी लक्ष्मी चौकदरम्यानचा रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी पीएमआरडीएसह विविध विभागांच्या समन्वयातून संयुक्त कारवाई सुरुवात करण्यात आली.
या रस्त्यादरम्यान अतिक्रमण केलेल्या काही व्यवसायिकांनी स्वतः आपले अतिक्रमण काढून घेत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिल्याचे कारवाईदरम्यान पुढे आले. अतिक्रमणामुळे रखडलेल्या या रस्त्याचे काम पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आल्याचे वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.












