हिंजवडी भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पीएमआरडीएने उचलली पावल

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नागरी समस्यांसह वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१) पाहणी केली. यात नैसर्गिक ओढे – नाल्यांतील पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार त्यांनी अपेक्षित दुरुस्ती केली, की नाही याची पाहणी यादरम्यान करण्यात आली.
हिंजवडी फेज – १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरात १३ ठिकाणी ओढे – नाल्यांचा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदल / अडवल्याचे पुढे आले होते. त्यामुळे संबंधितांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमआयडीसीतर्फे नोटीस देत पाण्याचा प्रवाह ३० जूनपर्यंत नैसर्गिकरित्या मोकळा करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने मंगळवारी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासह इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या हिंजवडी, माण, मारुंजी भागात पाहणी करत नोटीस बजावण्यात आलेल्या संबंधितांनी त्यांना दिलेल्या निर्देशानुसार काम केले, की नाही याची पाहणी केली. यासंबंधी अहवाल आल्यानंतर संबंधितांनी पाण्याचा प्रवाह खुला केला नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले.
मारुंजी – विप्रो सर्कल रोडवरील शेवटच्या ३०० मीटर रस्त्याचे काम उद्यापासून हाती घेण्यात येणार असून १५ ते २० दिवसात ते पूर्ण करण्यात येणार आहे. यासंबंधी अडचणी समजून घेत तातडीने काम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित रस्ता पुढे लक्ष्मी चौकात निघत असल्याने हिंजवडीतील वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. यासह विविध भागाची पाहणी करून मेट्रो प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनिल मरळे यांच्यासह इतर प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.












