ताज्या घडामोडीपिंपरी

‘पीएमआरडीए’ च्या प्रस्तावित कामांसाठी आमदार लांडगे ‘‘ॲक्शन मोड’’वर!

आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक - नदीसुधारसह, वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए)च्या प्रस्तावित कामांसाठी भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक घेतली. शहराच्या अनुषंगाने पीएमआरडीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विविध विकास प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच, प्रलंबित विकास कामांना तातडीने गती द्यावी, निधीसाठी पुरवठा करावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.

पुण्यातील ‘पीएमआरडीए’ प्रशासकीय इमारतीत गुरुवारी (दि 24) बैठक पार पडली. पिंपरी-चिंचवड शहराच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या ‘पीएमआरडीए’च्या प्रस्तावित योजना व विविध विकास प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रीनाज पठाण, उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हिम्मत खराडे, सह महनगर नियोजनकर श्वेता पाटील, सह आयुक्त दीप्ती सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांनी पीएमआरडीएकडील प्रलंबित कामांविषयी तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना केली. औद्योगिक प्रदर्शन केंद्र बाबत कालावधी कृती आराखडा करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने नियोजन करावे असे सांगितले. या प्रदर्शन केंद्रासाठी राज्य शासनाकडे 200 कोटी रुपयांची निधीची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी इंद्रायणी व पवना नदी सुधार प्रकल्प बाबत सादरीकरण केले. केंद्र आणि राज्य शासनाकडून इंद्रायणी व पवना नदी सुधार योजनेसाठी निधी बाबत सद्यस्थिती आमदारांनी जाणून घेतली. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प नागरिकांच्या भावनांशी जोडलेला असल्याने, तो जलद गतीने (फास्ट ट्रॅक) पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. इंद्रायणी व पवना हे दोन्ही प्रकल्प पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्याशी निगडीत आहेत. या दोन्ही नद्यांमधून महापालिका पाणी उचलते. त्यामुळे नद्या स्वच्छ ठेवायला हव्यात. त्यासाठी उगम ते संगम नदी सुधार प्रकल्पाची अंमलबजावणी करावी आणि नदी सुधार प्रकल्प प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली.

प्रदर्शन केंद्राची ओळख शंभूराजांच्या नावाने व्हावी…
पीएमआरडीए च्या जागेमध्ये होत असलेले औद्योगिक प्रदर्शन केंद्र पिंपरी चिंचवड शहराची नवी ओळख ठरणार आहे. तर या जागेत होत असलेले धर्मवीर संभाजी महाराजांचे स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभषण’ हिंदुस्थानचे भूषण ठरणार आहे. त्यामुळे या औद्योगिक प्रदर्शन केंद्राची ओळख ‘‘हिंदुभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र’’ अशी व्हावी अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. यावर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन आयुक्त योगेश म्हसे यांनी दिले. तसेच, या प्रदर्शन केंद्राचा सहभाग केंद्र सरकारच्या ‘भारत मंडपम्‌’ उपक्रमांत समावेश व्हावा, त्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, अशीही सूचना आमदार लांडगे यांनी केली आहे.

शिक्षण संस्थांना जागेसह मूलभूत सुविधा पुरवा…
पुणे शहर विद्येचे माहेर घर आहे. 100 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थांनी पिंपरी-चिंचवडमध्ये शाखा विस्तार करावा. यासाठी पीएमआरडीएने सकारात्मक भूमिका घ्यावी. सीईओपी, आयआयएमची शाखा शहरात होते आहे. त्याच धर्तीवर पुण्यातील प्रतिष्ठित फर्ग्युसन, एसपी, ज्ञानप्रबोधनी, सिंम्बायोसिस अशा संस्थांना निमंत्रित करावे. या करिता प्राधिकरणाने भूखंड उपलब्ध करुन द्यावेत. त्यांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. त्याअनुशंगाने संबंधित शिक्षण संस्थांची यादी तयार करण्यात येईल व संयुक्त बैठक घेऊन याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे एकमत करण्यात आले.

वाहतूक कोडी सोडवण्याचा प्रयत्न…
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रीय महामार्ग आणि अंतर्गत मुख्य रस्त्यांवर चाकण, रांजणगाव, तळेगाव, हिंजवडी अशा औद्योगिक व आयटी पट्टयातून सकाळी व संध्याकाळी कामावर ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, प्रवाशांना मोठ्याप्रमणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर, तळेगाव- शिक्रापूर रस्ता यासह इनर रिंगरोडचे काम गतीमान करणे आवश्यक आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी. तसेच, अंतर्गत मुख्य रस्ते आणि महामार्ग यांच्या ‘‘मिसिंग लिंक’’ पूर्ण करुन वाहतूक सक्षमीकरण करण्याबाबत ‘कृती आराखडा’ तयार करावा. चाकण ते पिंपरी-चिंचवड या १० ते १२ किमी अंतरासाठी नागरिकांना २ ते २.३० तास कोंडींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पर्यायी रस्ते तयार करावेत. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलीस, एमआयडीसी आणि जिल्हा प्रशासनासोबत एकत्रित मिटिंग निश्चित करावी, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर मेट्रोसिटीच्या म्हणून प्रगतीशील वाटचाल करीत आहे. पीएमआरडीए अंतर्गत शहर व लगतच्या परिसरामध्ये विविध प्रकल्प तसेच सेवा सुविधांविषयी कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पीएमआरडीएचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्याच्या ‘व्हीजन’ला साजेसा कारभार या अस्थापनेच्या माध्यमातून झाला पाहिजे. यासाठी विविध प्रकल्प तसेच सेवा सुविधांच्या बाबतीत बैठक घेतली. पिंपरी-चिंचवड, पुणेसह ग्रामीण भागातील विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. प्रलंबित कामे तातडीने पूर्णत्वाला न्यावीत अशी सूचना यावेळी केली. पीएमआरडीएच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे प्रकल्प, विकासकामे उभा करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button