पीएमपीएमएल बसवर झाड कोसळल्याची घटना : अग्निशमन विभागाची तातडीची कारवाई
चिंचवड-आकुर्डी रस्त्यावरील घटना; काही मिनिटांत बचावकार्य करून वाहतूक सुरळीत, एका प्रवाशाला किरकोळ दुखापत

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास चिंचवड-आकुर्डी रस्त्यावर पीएमपीएमएल बसवर मोठे झाड कोसळल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने कार्यवाहीस सुरूवात झाली,सदर घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्पच झाली होती आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण येथून दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन जवानांनी काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल होत त्वरित बचावकार्य सुरू केले. अत्यंत दक्षतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने झाड कापून बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याला घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. सुदैवाने कोणतीही मोठी जिवीतहानी झाली नाही.
अग्निशमन विभागाने वेळेवर दाखवलेली तत्परता आणि सज्जता यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग २४ तास कार्यरत असून कोणताही आपत्कालीन प्रसंग आढळल्यास नागरिकांनी ७०३०९०८९९१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा.
घटनास्थळी पोहोचताच आम्ही सर्वप्रथम बसमधील प्रवाशांची सुरक्षितता तपासली. तात्काळ झाड हटवण्याचे काम सुरू केले आणि काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. वेळेवर प्रतिसाद दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अशा आपत्कालीन प्रसंगात नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ ७७५७९६६०४९ या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही सतत दक्ष आहोत आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत
– गौतम इंगवले, उपअधिकारी, अग्निशमन विभाग












