“पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात वारंवार वीज खंडितता; उद्योजकांनी महावितरणकडे तातडीच्या उपाययोजनांची केली मागणी”

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी महावितरण, महापालिका आणि लघुउद्योग संघटनेची संयुक्त बैठक घेण्याची गरज आहे. विविध भागांमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, अंडरग्राउंड केबल्स टाकणे, फिडर विभाजन करणे व गैरप्रकार रोखण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. तसेच तांत्रिक अधिकाऱ्यांची कार्यक्षम नेमणूक करून वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे येथे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सचिव जयंत कड व संचालक प्रमोद राणे यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना पिंपरी चिंचवड व चाकण औद्योगिक परिसरात महावितरण विषयी येणाऱ्या अडचणीचे निवेदन दिले. या प्रसंगी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार, संचालक पालीवार, मुख्य अभियंता काकडे, कार्यकारी अभियंता देवकर, चाकणचे कार्यकारी अभियंता एडके हे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रामध्ये वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे स्थानिक उद्योजक आणि रहिवासी यांच्यात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, विविध तांत्रिक व सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली जात आहे.
औद्योगिक भागांमध्ये शक्य तिथे अंडरग्राउंड केबल्स टाकाव्यात, पिंपरी-चिंचवड विभागातील वीज तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे सुचवण्यात आले आहे. काही ठिकाणी महावितरणच्या रोहित्र व डीपीजवळ अज्ञात लोक कचरा जाळत असल्याने सुरक्षा धोक्यात येत आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
महावितरण व महानगरपालिकेच्या रस्ता खोदाई दरम्यान समन्वयाच्या अभावामुळे केबल्स तोडल्या जातात. यासाठी तिन्ही संस्थांमध्ये समन्वय बैठक घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
सेंच्युरी एन्का व इंद्रायणीनगर सबस्टेशनमध्ये मंजूर ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवावेत. टाटा सबस्टेशनमधील 50 MV ट्रान्सफॉर्मर काढून 100 MV ट्रान्सफॉर्मर बसवावा व जुने ट्रान्सफॉर्मर इतर उपकेंद्रांमध्ये हलवावेत, अशी विनंती केली आहे.
चाकण फेज 2 मधील PAK TIME फिडर खूप लांब असल्यामुळे वारंवार खंडित होतो. याचे विभाजन RMU व केबल्सद्वारे करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर डबल पोल डीपी स्ट्रक्चर हटवून तो कनेक्शन धारकांच्या जागेवर बसवावा, कारण त्याचा उद्योजकांच्या वाहतुकीवर परिणाम होतो.
या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी सामूहिक मागणी करण्यात आली आहे.








