ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण
शैक्षणिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी करार महत्त्वाचा – प्रा. ली क्यू-ताई
पीसीयू आणि दक्षिण कोरियातील सोगांग विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या मधील उच्च शिक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वाचा टप्पा असल्याचे दक्षिण कोरिया येथील सोगांग विद्यापीठाचे उपाध्यक्ष, संशोधन कार्य व उपसंचालक प्रा. ली क्यू-ताई यांनी सांगितले..
ग्लोबल कोरियन स्टडीज विभाग अधिष्ठाता प्रो. किम डॉन्ग ताएक, यांनी सांगीतले की, या करारामुळे संस्कृती आधारित शिक्षण व शैक्षणिक उत्कृष्टतेच्या नव्या वाटा खुल्या होतील.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) जागतिक शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दक्षिण कोरियातील सोगांग विद्यापीठासोबत पीसीयूच्या कॅम्पस मध्ये सामंजस्य करार केला.
यावेळी ग्लोबल कोरियन स्टडीज विभाग अधिष्ठाता प्रो. किम डॉन्ग ताएक, स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझर युजिन हान, दक्षिण कोरियाचे स्टाराजिन, पीसीयू कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी, प्र- कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे व वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते.
भारत, दक्षिण कोरिया दरम्यान नवनवीन संशोधन व नवोन्मेष प्रकल्पांना चालना देण्यासाठी अशा सहकार्याची आवश्यकता असल्याचे पीसीयू कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगीतले.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, व्यवस्थापन, संगणक अनुप्रयोग, सायबर सुरक्षा, कायदा, फार्मसी, डिझाईन, विज्ञान व मीडिया या विविध क्षेत्रांतील संभाव्य संशोधन सहकार्य, विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण तसेच संयुक्त शैक्षणिक उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली.
पीसीयू प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे सांगितले की, यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील शिक्षणाचा अनुभव, संशोधनाच्या संधी आणि करिअर विकासासाठी नवनवीन मार्ग उपलब्ध होतील. या एमओयू च्या माध्यमातून पीसीयू २१ व्या शतकातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी जागतिक शिक्षण परिसंस्था घडविण्याचे ध्येय पुढे नेत आहे.
पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.













