ताज्या घडामोडीपिंपरी

परदेशात जाण्याची गरज नाही, आता भारतात मुबलक संधी उपलब्ध – अमेरिकेचे खासदार श्री ठाणेदार 

पीसीयूच्या वतीने श्री ठाणेदार यांचा ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्कार देऊन गौरव

Spread the love
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय तरुणांनी आता परदेशात जाण्याची गरज नाही. भारतात आता उद्योग, व्यवसायाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेऊन आपण उद्योग, व्यवसायात पुढे गेले पाहिजे असे मार्गदर्शन अमेरिकेतील एकमेव मराठी खासदार श्री ठाणेदार यांनी पुण्यात केले.
      गुरुवारी (दि.२९) पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) आणि महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, गर्जे मराठी ग्लोबल आणि रुरल आंत्रप्रिन्युअर कनेक्ट इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात श्री ठाणेदार बोलत होते. यावेळी श्री ठाणेदार यांना महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांच्या हस्ते ‘लिव्हिंग लिजंड ऑनर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, कॉमसेन्स टेक्नॉलॉजीज्‌चे अध्यक्ष सागर बाबर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, माधव दाबके आदी उपस्थित होते.
   अमेरिकेच्या संसदेतील एकमेव मराठी खासदार, एक यशस्वी उद्योजक व ‘ही श्रींची इच्छा‌’ या गाजलेल्या आत्मचरित्राचे लेखक म्हणून श्री ठाणेदार यांना ओळखले जाते. सध्या ते मिशिगनच्या १३ व्या काँग्रेसनल जिल्ह्यातून प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
   सत्काराला उत्तर देताना श्री ठाणेदार म्हणाले की, माझी आई आणि अब्राहिम लिंकन हे माझे आदर्श आहेत. त्यामुळे नोकरी उद्योग, व्यवसायातील अनेक अपयशांचा सामना करून पुन्हा उभा राहिलो. मंदीच्या काळात संपूर्ण व्यवसाय बुडाल्यावर मी खचून गेलो नाही. आधीच्या चुका परत करायच्या नाहीत, एवढे शिकलो आणि नव्याने व्यवसाय उभारले. एका टप्प्यावर मला भौतिक यशाचे आकर्षण वाटेनासे झाले आणि मी समाजसेवा करण्याच्या हेतूने राजकीय क्षेत्रात प्रवेश केला, निवडणूक लढवली. तिथेही सुरवातीला अपयश आले. पण मी प्रयत्न सोडले नाहीत. तयारी करून पुन्हा प्रयत्न केल्यावर यशस्वी ठरलो आणि आता खासदार या भूमिकेतून लोकांसाठी काम करण्याचे समाधान अनुभवत आहे. तरुणाईने स्वतःवर सदैव विश्वास ठेवून, पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. अपयशाने खचून न जाता, पुन्हा उभे राहिले पाहिजे असा सल्ला ठाणेदार यांनी तरुणांना दिला. उद्योग, व्यवसाय आणि भारत अमेरिका यांच्यातील सध्याच्या संबंधातील काही मुद्द्यांवरही ठाणेदार यांनी मत व्यक्त केले. आता परदेशात जाण्याची गरज नाही भारतातच अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मी जेव्हा अमेरिकेत आलो, तो काळ खूप वेगळा होता.आताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण हे विवादास्पद आणि अमेरिकेला मागे नेणारे आहे. त्याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. अमेरिकेतील बहुतांश तंत्रउद्योग बाहेरील कुशल मनुष्यबळावर अवलंबून आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या धोरणाला देशातूनही विरोध आहे असेही श्री ठाणेदार यांनी सांगितले.
  सचिन ईटकर म्हणाले की, ठाणेदार यांचे जीवन म्हणजे तरुणाई साठी प्रेरणा आहे. संघर्ष या संज्ञेला त्यांनी जणू अर्थ दिला आहे. आव्हाने आणि धाडस, यांचे दुसरे नाव म्हणजे ठाणेदार असे म्हणावे लागेल.
   प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, युवकांनी हीरो आणि आयडॉल यांच्यातील फरक समजून घेतला पाहिजे. ठाणेदार यांच्यासारख्यांची चरित्रे युवकांसमोर असली पाहिजे. त्यासाठी साहित्य महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. यावेळी ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाअंतर्गत संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रासाठी योगदान देणारे उद्योजक गणेश निभे यांचाही सत्कार श्री ठाणेदार यांच्या हस्ते करण्यात आला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयूचे उप कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले आणि माधव दाबके यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button