ताज्या घडामोडीपिंपरी

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पोषण आहार सप्ताह’

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘पोषण आहार सप्ताह’ उत्साहात राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतुलित व आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला पालक व शिक्षकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान न देता प्रत्यक्ष अनुभवातून आरोग्य आणि पोषणाचे धडे देण्याचा प्रयत्न या सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येतोय. खाद्यपदार्थांचे अंकुरित धान्य, आंबवलेले पदार्थ, पोषक पदार्थ, नाश्ता व उपवासाचे पदार्थ, ज्वारी-बाजरी व इतर धान्याचे पदार्थ, फळांचा दिवस असे गट करून त्यानुसार विद्यार्थ्यांचा प्रत्येक दिवसाचा आहार ठरविण्यात येतोय. तसेच विद्यार्थ्यांना प्रथिने, फायबर, खनिजयुक्त धान्यांचे महत्त्व व जीवनसत्त्वांचे महत्त्व सांगण्यात येत आहे. आंबवलेल्या पदार्थांमुळे पोषणमूल्य कसे वाढते? पचन कसे सुधारते? याबाबत माहिती दिली जातेय.

विद्यार्थ्यांना कार्बोहायड्रेट, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे व खनिजे या पाच प्रमुख अन्नघटकांबद्दल माहिती देण्यात येतेय. तसेच आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येत आहे. हा उपक्रम केवळ आहार सप्ताह न राहता विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळविणारा एक शैक्षणिक अनुभव ठरतोय.

आहाराचे वेळापत्रक

पहिला दिवस (अंकुरित धान्य) : मूग, मटकी, हरभरा यांचे पौष्टिक पदार्थ.

दुसरा दिवस (आंबवलेले पदार्थ) : इडली, सांबार, अप्पम यांसारखे पदार्थ.

तिसरा दिवस (पोषक पदार्थ) : पालक, मेथी यांचा समावेश असलेले पराठे, धिरडे, थालीपीठ.

चौथा दिवस (नाश्ता व उपवासाचे पदार्थ) : पोहे, उपमा, शिरा, साबुदाणा वडे/खिचडी.

पाचवा दिवस (ज्वारी-बाजरी व इतर धान्ये) : भाकरी, नाचणी व तांदळाचे पदार्थ.

सहावा दिवस (फळांचा दिवस) : सफरचंद, द्राक्षे, चिकू, संत्री यांसारखी हंगामी फळे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून राबवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे आरोग्यच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांमध्येही सकारात्मक संदेश पोहोचतो. संतुलित आहार व योग्य पोषण हीच मुलांच्या सर्वांगीण विकासाची खरी पायरी आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

आरोग्यदायी आहार हीच मुलांच्या निरोगी भविष्याची गुरुकिल्ली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना लहान वयात योग्य आहाराचे महत्त्व समजते आणि त्यांचा शारीरिक तसेच मानसिक विकास घडतो.
– किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button