पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १०५ प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षक कार्यरत

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शहरात एकूण १०५ प्राथमिक शाळा कार्यरत असून, त्यात मराठी माध्यमाच्या ८७, उर्दू माध्यमाच्या १४, हिंदी माध्यमाच्या २ आणि इंग्रजी माध्यमाच्या २ शाळांमध्ये कला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि कला शिक्षणाद्वारे त्यांच्या सृजनशील विकासाला चालना मिळावी, या हेतूने महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मागील शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या ३४ शाळांमध्ये एकूण १७ कला शिक्षक कार्यरत होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे निरीक्षण करून आणि कला शिक्षणाला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने, यंदा महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व १०५ शाळांमध्ये कला शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना गुणात्मक व सांस्कृतिक शिक्षण मिळावे यासाठी सर्व शाळांमध्ये एकत्रित मानधनावर कला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कला विषय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, चित्रकला, हस्तकला, रेखाटन, नाट्य, क्राफ्ट इत्यादी क्षेत्रात मार्गदर्शन मिळणे आता नियमितरित्या शक्य झाले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा, प्रदर्शने, कार्यशाळा आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागाची संधी वाढणार आहे.
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ही प्रक्रिया राबवण्यात आली. उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, आणि कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्या अधिपत्याखाली ही नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
शहरातील विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात प्रोत्साहन, दिशा आणि संधी उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे ध्येय असून, या निर्णयामुळे शहरातील शाळांमध्ये सृजनशीलतेचे वातावरण निर्माण होणार आहे. कला शिक्षकांच्या उपस्थितीमुळे मुलांची कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील सहभागाला अधिक गती मिळेल.
कला क्षेत्रात महापालिकेच्या विद्यार्थ्यांची कामगिरी
मुंबईतील प्रतिष्ठित ‘म्युझियम ऑफ सोल्युशन्स’ (MuSo) संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोन विद्यार्थ्यांची चित्रे राज्यभरातील ५०० हून अधिक स्पर्धकांमधून निवडली गेली आहेत. याशिवाय, महापालिकेच्या २५ विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना जागतिक स्तरावर प्रदर्शनासाठी संधी मिळाली आहे.
तसेच, महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षांमध्ये महापालिकेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असून, दरवर्षी शंभर टक्के उत्तीर्णता नोंदवली जाते. याशिवाय, मुंबईत आयोजित प्रतिष्ठित कला महोत्सवासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चार शाळांची निवड झाल्याने महापालिकेच्या शाळांमधील कला शिक्षणाच्या गुणवत्तेला महत्त्वपूर्ण दाद मिळाली आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा महापालिकेचा केंद्रबिंदू आहे. कला शिक्षण हे मुलांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक शाळेत कला शिक्षक उपलब्ध झाल्याने मुलांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि प्रगतीसाठी योग्य व्यासपीठ मिळेल.
– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका




















