ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांची मुंबईतील प्रदर्शनासाठी निवड

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली कलात्मक प्रतिभा राज्य पातळीवर दाखवून दिली आहे. मुंबई येथील म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) या प्रतिष्ठित संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशन” या कला स्पर्धेत महापालिकेच्या दोन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र राज्यभरातून आलेल्या ५०० हून अधिक स्पर्धकांमधून निवडण्यात आली आहेत. ही स्पर्धा नुकतीच पार पडली.

महाराष्ट्रातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. “सर्जनशीलता, कल्पकता आणि सामाजिक जाण” या तिन्ही घटकांवर आधारित या स्पर्धेत महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीद्वारे एक वेगळा ठसा उमटवला. या स्पर्धेतील पहिल्या ५५ उत्कृष्ट चित्रांमध्ये पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल, खिंवसरा पाटील कन्या थेरगाव येथील विद्यार्थिनी दिव्या अविनाश उपर्वट, आणि छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम कासरवाडी शाळेचा विद्यार्थी वेदांत चौघुले यांनी रेखाटलेल्या चित्रांची निवड झाली आहे.

आता ही चित्र मुंबईतील म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) या नामांकित संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. दिव्या उपर्वट हिने “भविष्यातील पर्यावरण आणि त्यासाठीचे उपाय” या विषयावर प्रभावी चित्र रेखाटले असून, पर्यावरण रक्षणासाठी जागृती निर्माण करणारा संदेश तिच्या चित्रातून झळकतो. तर वेदांत चौघुले याने “माझे स्वप्न” या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून’ मी एक वैज्ञानिक’ हे प्रेरणादायी चित्र रेखाटले.

महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, कला विभागाचे नोडल अधिकारी श्रीकांत चौघुले, पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल, खिंवसरा पाटील कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, कला शिक्षक प्रीती अहिरे आणि छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम कासरवाडी शाळेचे मुख्याध्यापक पारीजात प्रकाश यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कला शिक्षकांनी या स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना “माझे स्वप्न” आणि “एआय नाही करू शकत” हे दोन विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना आणि कल्पनांना रंगांच्या माध्यमातून समाजाविषयीची जाण, भविष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाबाबतची जागरूकता अत्यंत कलात्मक पद्धतीने सादर केली. प्रत्येक कलाकृतीत मुलांच्या विचारविश्वाची खोली आणि नवोन्मेषी दृष्टिकोन स्पष्ट दिसून आला.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर समाज, विज्ञान आणि भविष्य यांना रंगांच्या माध्यमातून व्यक्त केलं, हीच खरी शिक्षणाची ताकद आहे. या स्पर्धेने आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या कल्पकतेला उंच भरारी देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.

– किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button